- चंद्रकांत शेळके अहमदनगर - मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून तोडफोड होण्याच्या शक्यतेने गेल्या चार दिवसांपासून एसटी सेवा बंद आहे. या चार दिवसात ५ लाख १७ हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्या असून एसटीचे सुमारे दीड कोटीचे उत्पन्न बुडाले आहे. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सोय व एसटीच्या उत्पन्नाचा कालावधी लक्षात घेता लवकरात लवकर बससेवा सुरळीत व्हावी, अशी अपेक्षा एसटी महामंडळाकडून व्यक्त होत आहे.
मराठा आंदोलनामुळे प्रारंभी मराठवाड्यातील एसटी सेवा विस्कळीत झाली. बीड जिल्ह्यात काही बसची तोडफोड झाल्याने अहमदनगर विभागीय कार्यालयाने सोमवारी (दि. ३०) बीडकडे जाणारी वाहतूक बंद केली. त्याच दिवशी इतर काही आगारांच्या फेऱ्याही कमी करण्यात आल्या. परिणामी पहिल्या दिवशी ६४ हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्याने १८ लाखांचे उत्पन्न बुडाले.
दरम्यान, मंगळवारपासून तुरळक फेऱ्या वगळता सर्वच फेऱ्या रद्द झाल्याने १ लाख २६ हजार किलोमीटरच्या फेऱ्या बंद राहिल्या. त्यामुळे मंगळवारी ३२ लाख ५० हजारांचे नुकसान झाले. बुधवारीही आंदोलनावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे महामंडळाने एसटी बससेवा बंदच ठेवली. परिणामी बुधवारी १ लाख ७९ हजार किलोमीटर फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यात ४६ लाखांचे नुकसान झाले. त्यानंतर गुरूवारी सायंकाळपर्यंत फेऱ्या बंदच होत्या. त्यात दीड लाख किलोमीटरच्या ४० लाखांचे नुकसान झाले. असे एकूण चार दिवसांत ५ लाख १७ हजार किलोमीटर फेऱ्या रद्द होऊन सुमारे दीड कोटीचे नुकसान झाले.
दरम्यान, चारही दिवस खासगी प्रवाशी वाहतूक सुरू होती. यात अनेक प्रवाशांची आर्थिक लूट झाल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून झाल्या.