कोपरगाव (जि. अहमदनगर) : आरक्षण आमच्या हक्काचे.., येळकोट येळकोट जय मल्हार..., छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देत मराठा आरक्षणासाठी सरकारला जाग यावी यासाठी सोमवारी चंपाषष्टीच्या दिवशी कोपरगावात सरकारची तळी भरण्यात आली. गेल्या अठरा दिवसांपासून कोपरगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. अनिल गायकवाड, विनय भगत, विकास आढाव, अमित आढाव, प्रवीण शिंदे, सुनील शिंदे, विजय जाधव, सचिन आढाव, साई नरोडे, प्रशांत वाबळे, लक्ष्मण सताळे उपोषण करीत आहेत.
सोमवारी चंपाषष्टी असल्याने अभिनव आंदोलन करण्यात आले. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारला जाग यावी, तसेच राज्य सरकारमधील मंत्री छगन भूजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरूद्ध वक्तव्य करीत आहेत, त्यामुळे दोन समाजात दुही निर्माण होत आहे. त्यांच्या मंत्रीपदाचा राजिनामा घ्यावा, अशी मागणी करीत, सरकारची तळी भरण्यात आली. यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचे, छत्रपती शिवाजी महाराज की जय.. अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
उपोषणकर्ते अनिल गायकवाड म्हणाले की, सरकारला जागा यावी म्हणून प्रतिकात्मक तळी भरून त्यांचा निषेध करीत आहोत. भुजबळांनी निवडणूकीत कुठेही उभे राहावे, त्यांना मराठा समाज जागा दाखवून देईल, असे गायकवाड म्हणाले. शिंदे म्हणाले की, हक्काचे आरक्षण मिळावे म्हणून आम्ही हे आंदोलन केले आहे. आरक्षण देण्यात चालढकल करणाऱ्या शासनाचा आम्ही निषेध करतो. जबाबदर असलेले मंत्री चुकीचे वक्तव्य करीत आहेत. त्यांना मंत्री मंडळातून बाहेर काढावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठा समाज बांधव आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित होते.