चंद्रकांत शेळके, अहमदनगर: एसटीतून प्रवास करताना आतापर्यंत तिकीट काढण्यासाठी सुट्या पैशांची मोठी समस्या जाणवत होती. अनेकदा या सुट्या पैशावरून प्रवासी व वाहकामध्ये वादही होत. मात्र आता एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट देण्याची सोय केली आहे. त्यामुळे प्रवाशांची आता तिकिटासाठी सुट्या पैशांची चिंता मिटणार आहे.
एसटीत पारंपरिक पद्धतीने अजूनही रोख पैसे घेऊन तिकीट देण्याची पद्धत आहे. परंतु यात बऱ्याचदा सुटे पैेसे नसल्याने तिकिटाची अडचण होते. सुटे पैसे नसतील तर कंडक्टर (वाहक) उतरताना उरलेले पैसे घ्या म्हणतात. बऱ्याचदा घाईत उतरताना ते पैसे घेण्याचे प्रवासी विसरतात. किंवा वाहकाकडेच सुटे पैसे नसतील तर प्रवाशांसोबत तू-तू मै-मै होते. यावर आता एसटी महामंडळाने कायमस्वरूपी तोडगा काढला असून आता डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट देण्यात सोय करण्यात आली आहे. सर्व वाहकांसाठी ॲण्ड्राईड तिकीट इश्यू मशिन्स (ईटीआयएम) नव्याने सेवेत दाखल झाल्या आहेत. नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येणार आहे. शिवाय रोख पैसे देऊनही याच मशीनमधून तिकीट मिळणार आहे.
मे. ईबीक्सकॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर लिमिटेड यांच्या सहकार्याने महामंडळाच्या राज्यातील सर्व वाहकांसाठी नवीन ॲण्ड्राईड आधारित डिजिटलची सुविधा असणारी तिकीट मशीन्स घेण्यात आल्या आहेत. सध्या रोखीने व्यवहार होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. डिजिटल व्यवहाराला चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत तिकीट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे यासारख्या यूपीआय पेमेंटसाठी वाहकाकडे असलेल्या अँड्राईड तिकीट मशीनवर असलेल्या क्यूआर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे. अर्थात प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत म्हणून एसटीने प्रवास करणे टाळणे, तसेच सुट्या पैशासाठी वाहकासोबत होणारा विनाकारण वाद असे प्रश्न कायमचे मिटू शकणार आहेत. यूपीआय पेमेंटद्वारे क्यूआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरु झालेली असून, जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात १४७० मशीन दाखल
एसटीच्या अहमदनगर विभागीय कार्यालयांतर्गत ११ आगार असून तेथे १४७० कंडक्टर कार्यरत आहेत. या प्रत्येकाला एकेक म्हणजे १४७० डिजिटल मशीन देण्यात आले आहे. काही मशीन आरक्षितही आहेत.