- बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : एक काळ असा होता की एखाद्या साहेबाला नेण्यासाठी कार यायची. पण, बदलत्या काळात श्रीगोंदा तालुक्यात शेतीत काम करणाऱ्या मजुरांना महत्त्व आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अगदी सकाळीच मजुरांच्या दारी आलिशान कार उभ्या राहत आहेत आणि शेतात गेले की पिण्याच्या पाण्यासाठी जार आणि दोन वेळा गरमागरम चहाही दिला जात आहे.
कुकडी, घोड, भीमा, सीनेच्या पाण्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील ७७ टक्के क्षेत्र ओलिताखाली आले. ऊस फळबागांनी तालुका बहरला. यांत्रिकीकरण बांधकामाचा वेग वाढला आणि प्रगतीचे चक्र फिरले. तालुक्यात युवा वर्ग शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराकडे झुकला. तसा शेतात मजुरांचा तुटवडा भासू लागला.
शेतात काम करण्यासाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली. अशा परिस्थितीत परप्रांतीय मराठवाडा, खान्देशमधील मजुरांचे लोंढे श्रीगोंद्याच्या कृषी पंढरीत स्थिरावले आहेत. काही जणांनी मजुरीवर शेती विकत घेण्यास सुरुवात केली आहे. द्राक्षे व डाळिंब भागातील कामे अतिशय कसरतीची असल्याने ही कामे परप्रांतीय मजूर 'धोका' पत्करून करतात. त्यांना श्रमाचा मोबदलाही त्या प्रमाणात मिळतो. सध्या अशा मजुरांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.
बागायतदार मंडळींना मजुरांना शेतात कामाला आणण्यासाठी आपली आलिशान कार घेऊन मजुरांकडे जावे लागते. कार नसेल मजूर दुसरीकडे कामाला जातात. त्यामुळे मजुरांच्या दारी अगदी सकाळीच कार येतात. संध्याकाळी पुन्हा वेळेत घरी आणून सोडतात. तसेच दिवसभरात दोनदा चहाही द्यावा लागतो. तसेच पिण्यासाठी जारचे शुद्ध पाणी द्यावे लागते. त्यामुळे मजुरांच्या श्रमाला चांगलीच प्रतिष्ठा निर्माण झाली आहे.
आम्ही गुजरात राज्यातून महाराष्ट्रात शेतीच्या कामासाठी येतो. प्रवासात वेळ जाऊ नये यासाठी चारचाकी वाहनातून कामाला जातो. यामध्ये शेतकयांचा फायदा होतो. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा व राहण्याचा प्रश्न अवघड आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - अजय तुळशीराम भवर, रा. निरवळ, ता. कोपराडा, जि. वलसाड, गुजरात
नैसर्गिक समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे औषधे आणि नियोजन विना शेती राहिली नाही. मजुरांचा तुटवडा आहे. त्यामुळे मजुरांना महत्त्व आले आहे. मजुरांना आणण्यासाठी कार घेऊन जावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी जारची व्यवस्था करावी लागते.- दत्तात्रय जगताप, लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"