कर्जत : काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने पन्नास वर्षे सत्ता दिली. राज्यातील अनेक प्रश्नांचा त्यांनी फक्त राजकारणासाठी वापर केला. सर्व प्रश्न प्रलंबित ठेवून जनतेला झुंजवले. त्यांच्या या निष्क्रीयतेमुळेच जनतेचे दिवाळे निघाले, असा आरोप माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कर्जत तालुक्यातील राशीन येथे उदयनराजे भोसले यांच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी खा.सुजय विखे व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उदयनराजे पुढे म्हणाले, भाजपचे नेते, तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांनी कृष्णा खोरेचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेतले होते. त्यांचे दुष्काळी भागाला पाणी देण्याचे ध्येय होते. त्यानंतर पुन्हा सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने हे काम १५ वर्षे बंद पाडले. केवळ घोषणाच त्यांनी केल्या. कृष्णा खोरेचा प्रकल्प बंद पाडला. पैसा मात्र मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. हा पैसा कुठे गेला? असा प्रश्न त्यांनाच विचारा. अनेक वर्षांच्या सत्तेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना अहंकार निर्माण झाला होता. त्यांनी कधी जनतेचा विचार केला नाही. दुष्काळी भागाला पाणी देता येईल का? बेरोजगारांना रोजगार देता येईल का? याचा विचार त्यांनी केला नाही. यामुळे राष्ट्रवादीवर आत्मक्लेश करण्याची वेळ आली आहे. राम शिंदे यांनी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केले. त्यांनी प्रत्येक वेळी समाजाचे हीत जोपासले. फक्त जनतेच्याच प्रश्नाचा विचार केला. त्यामुळे याही वेळी त्यांनाच बळ द्या, असे आवाहन उदयनराजे यांनी केले.राम शिंदे म्हणाले, मतदार संघातील महिलांना बचत गटामार्फत काम दिले जाईल. फाईव्ह स्टार एमआयडीसी उभारणार. दुष्काळी भागाला कुकडीचे पाणी देण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न केले आहेत. अजून काही भागाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देणार आहे. सध्या पैशाच्या जोरावर निवडणूक सुरू आहे. आमच्या गरिबीची चेष्टा करु नका. हा मतदार विकासाला मत देणारा आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निष्क्रीयतेमुळे जनतेचे दिवाळे निघाले-उदयनराजे भोसले; राम शिंदे यांच्या प्रचारार्थ राशीनला सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 3:34 PM