लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी : सोलापूर-बोरगाव या चारपदरी महामार्गामुळे कोकणशी संपर्क वाढणार आहे. याचा फायदा ऊस, द्राक्षे व हळदी उत्पादक शेतकऱ्यांनाही होणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शिर्डी येथे व्यक्त केला.
मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी राज्यासाठीच्या १४ हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. यामध्ये अहमदनगर येथील आयुष हॉस्पिटलचे उद्घाटन, महिला व बालरुग्णालयाचे भूमिपूजन, शिर्डी विमानतळाजवळ नवीन टर्मिनल बिल्डिंगचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (१८६ किमी), जळगाव ते भुसावळला जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग (२४.४६ किमी), एनएच-१६६ (पॅकेज-१)च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा यांचे लोकार्पण या प्रकल्पांचा समावेश आहे.
एक लाख भाविक घेतील साईदर्शन
शिर्डीत येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांसाठी साई संस्थानने १०९ कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शनरांग प्रकल्प तयार केला आहे. या दर्शनरांगेच्या माध्यमातून दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेता येणार आहे. १९ ऑक्टोबर २०१८ रोजी या प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले होते.
पोट दुखणाऱ्यांसाठी मोफत दवाखाना
दे शाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील अनेक मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. राज्य वेगाने पुढे जात असून, ते वारंवार महाराष्ट्रात येतात. मात्र त्यामुळे काहींचे पोट दुखते. पोट दुखणाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे दवाखान्याची योजना आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली. राज्याच्या विकासासाठी डबल इंजिन सरकारची आवश्यकता असते. ते महाराष्ट्रात स्थापन झाले. पंतप्रधानांनी राज्यातील ३५ प्रकल्पांना मंजुरी दिली. हे प्रकल्प वायुवेगाने पुढे जात आहेत. मोदी यांच्या हाताला यशाचा परिस आहे. ज्या कामाला ते हात लावतात, त्याचे सोने होते, असेही ते म्हणाले.
छातीचा कोट करून महाराष्ट्र उभा : पवार
अजित पवार यांनी मोदी यांची स्तुती केली. ते म्हणाले, साईबाबा ‘सबका मालिक एक’ असा संदेश द्यायचे. मोदींनीही त्यातून प्रेरणा घेऊन ‘सबका साथ सबका विकास’ हा नारा दिला आहे. महाराष्ट्र सतत छातीचा कोट करून केंद्राच्या पाठीशी उभा राहिला. मोदी राष्ट्र बळकट करीत असल्याने आम्हीही त्यांच्यासोबत आहोत.