अहमदनगर : परतीच्या पावसाने जिल्हाभरात धुमाकूळ घातला असून, अतिपावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे़ तर काही ठिकाणी बंधारे वाहून गेले आहेत़ मुळा व गोदावरीला पूर आला आहे़संगमनेर तालुक्यातील दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणा-या तळेगाव दिघे परिसरात परतीच्या पावसाचे जोरदारपणे आगमन झाले. पावसामुळे शाळेच्या मैदानाला तळ्याचे स्वरुप आले असनू, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील बुद्धविहारालाही पाण्याने वेढले. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. गावक-यांच्या म्हणण्यानुसार गेल्या पाच सहा वर्षांपासून असा जोरदार पाऊसच झाला नव्हता. पावसामुळे संपूर्ण तळेगाव परिसरात आनंद व्यक्त होत आहे. कारण आतापर्यंत विहिरी, नाले, तळे पावसाळा संपत आला तरी कोरडी ठाकच होती. आता सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळे तळेगाव परिसरातून आनंद व्यक्त होत आहे.
अति पावसामुळे कांदा, भुईमुगाचे नुकसान
संगमनेर तालुक्याच्या पठार भागात सुरू असलेल्या सलग पावसामुळे ऐन काढणीस सुरूवात झालेल्या लाल सेंद्रीय कांदा व भुईमूग या नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाले आहेत. पठार भागात खरीप हंगामात बाजरी, कांदा, भुईमूग ही पिके प्रमुख आहेत. यावर्षीही सुरूवातीच्या दमदार पावसांमुळे या पिकांच्या पेरणीखालील क्षेत्रात वाढ झाली. वेळोवेळी झालेल्या पावसाने या पिकांची वाढ जोमाने झाली. बाजरी कापणीच्या वेळी जोरदार पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने बाजरीच्या मळणीची कामे पूर्ण झाली. सततच्या ऊन-पावसाच्या तापमान बदलांमुळे नांदूर खंदरमाळ, सारोळेपठार व लगतच्या गावांमधील जवळपास पंधराशे हेक्टर कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला.
शेतक-यांपुढे संकट
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे व पोहेगाव परिसरातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पोहेगाव परिसरात परतीचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. २-३ दिवसांपासून निर्माण झालेले ढगाळ वातावरण डाळींब व इतर पिकांना पोषक नाही. परतीच्या पावसाचा मोठा फटका बाजरी, सोयाबीन, मका आदी पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मुसळधार पावसाने शेतातील पिके आडवी होऊन सडू लागली आहेत. आधीच शेतीमालाला भाव नाही. त्यात परतीच्या पावसाने हातचे पिक नासविल्याने शेतकºयांपुढे संकट उभे राहिले आहे.