लोकमत न्यूज नेटवर्क
केडगाव : निबंळक बायपास ते केडगाव बायपासपर्यंतच्या मार्गात रस्ता लुटीच्या घटनांनी पुन्हा आपले डोके वर काढले आहे. परप्रांतीय ट्रक चालकांना लाकडी दांडक्यांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा बायपासवर आपली दहशत सुरू केली आहे. काही स्थानिकांना एकटे गाठून लुटण्यापर्यंत या चोरट्यांची हिमंत वाढली आहे.
गुन्हे दाखल करण्यास कोणी पुढे येत नसल्याने या चोरट्यांचे फावत आहे.
नगर - मनमाड ते नगर - सोलापूर मार्गाला जोडणाऱ्या निबंळक व केडगाव बायपासचा वापर बहुतांश जड वाहतूकदार करतात. दीड वर्षापासून हा मार्ग परप्रांतीय ट्रकचालकांना नकोसा झाला आहे. पहाटेच्या वेळी दुचाकीवरून येऊन चोरटे ट्रक चालकांना गाडी आडवी घालून अडवतात. हातातील दांडक्यांचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते. लवकर पैसे दिले नाही तर त्यांना मारहाण केली जाते. मारहाण टाळण्यासाठी बिचारे परप्रांतीय ट्रकचालक खिशातील पैसे काढून देतात. पहाटेच्या अंधारात या घटना घडत असल्याने मदतीला कोणीही नसते. अशा परिस्थितीत लूट झालेले ट्रकचालक गुन्हा दाखल करण्याच्या फंदात पडत नाहीत. यामुळे या चोरट्यांची हिमंत वाढत गेली आहे. रविवारी (दि. २८) पहाटे सहाच्या अंधारात एका दुचाकीवर बसलेल्या तीन चोरट्यांनी निबंळक उड्डाणपुलाजवळ एका परप्रांतीय ट्रक चालकाला लाकडी दांडक्याने मारहाण करीत पैशांची मागणी केली. नंतर याच चोरट्यांनी पहाटे फिरायला आलेल्या एका स्थानिक नागरिकाकडे पैशांची मागणी करीत दांडक्याने मारहाण सुरू केली. केडगाव बायपास चौकाजवळ पोलिसांची राहुटी आहे. तेथून हाकेच्या अंतरावरच ही घटना घडली. मारहाण झालेल्या नागरिकाने आरडाओरड सुरू केल्यानंतर तिन्ही चोरटे एका दुचाकीवरून पसार झाले.
....
केडगाव बायपास मार्गावर रस्ता लूट करणारी टोळी सक्रीय असेल तर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना द्यावी. यापुढे अशी लूट होणार नाही, यासाठी आम्ही बायपासवर गस्त वाढवून चोरट्यांना गजाआड करू.
- नितीन रणदिवे, सहायक पोलीस निरीक्षक, कोतवाली पोलीस ठाणे, नगर.
..
केडगाव बायपासला रस्ता लुटीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. आता पहाटे फिरायला जाणाऱ्या स्थानिक नागरिकांना लुटण्याचे व त्यांना मारहाण करण्याचे धाडस चोरट्यांचे झाले आहे. पोलिसांनी वेळीच या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहे.
- अमोल येवले, नगरसेवक, केडगाव.