संगमनेर : बसच्या तिकिटाच्या उर्वरित पैशांवरून वाहक आणि एका युवकाचा वाद झाला. या वादातून युवकाच्या आईने वाहकाला मारहाण केल्याने संगमनेर आगारातील चालक-वाहकांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या वादामुळे असंख्य प्रवासी ताटकळले होते. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेल्यानंतर तेथे सामंजस्याने मिटले. सुमारे चार तासानंतर आंदोलन मागे घेतल्याने संध्याकाळी सहाच्या सुमारास संगमनेर आगारातील बसेस बाहेर पडल्या.संगमनेर आगाराच्या अकोले-संगमनेर या बसमधून प्रवासी प्रवास करीत होते. या प्रवाशांपैकी एका युवकाने बसच्या वाहकास दोन हजार रूपयांची नोट देत संगमनेरपर्यंत तीस रूपयांचे तिकीट घेतले. वाहकाने तिकीट देताना त्यामागे १ हजार ९७० रुपए देणे बाकी असल्याचे लिहिले. संगमनेर आल्यानंतर उर्वरित पैशांवरून युवक व वाहक या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला.त्यानंतर या युवकाने त्याच्या आईला संगमनेर बसस्थानकात बोलावून घेतले. सदर महिला व वाहक या दोघांमध्ये वाद होवून महिलेने वाहकाला मारहाण केली. वाहकाला मारहाण झाल्याचे समजल्यानंतर संगमनेर आगारातील चालक-वाहकांनी काम बंद आंदोलन सुरू केले. त्यानंतर हे प्रकरण संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गेले.आगारप्रमुख प्रियांका उनवणे यांनी चालक-वाहकांशी चर्चा करीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, घडलेला प्रकार चुकीचा असून वाहकाची कुठलीही चूक नसताना त्याला विनाकारण मारहाण झाल्याचे उनवणे यांना सांगण्यात आले. सदर प्रकरण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यापर्यंत गेले. या प्रकारानंतर दुपारी दोनपासून संगमनेर आगारातील एकही बस बाहेर पडली नव्हती. त्यामुळे प्रवासी विशेष करून ग्रामीण भागातून शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी तसेच आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणारे भाविक ताटकळले होते.सामंजस्याने प्रकरण मिटलेअखेर संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास सामंजस्याने हे प्रकरण मिटले. त्यामुळे या पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झाली नव्हती. संध्याकाळी सहाच्या सुमारास चालक-वाहकांनी आंदोलन मागे घेतल्याने संगमनेर आगारातील बसेस मार्गस्थ झाल्या. या प्रकाराने मात्र, असंख्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
संगमनेर येथील घटना : वाहक आणि महिलेच्या वादामुळे बसस्थानकात प्रवासी ताटकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 5:49 PM