शिर्डी : उत्तर नगर जिल्ह्याच्या दुष्काळपट्टयाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री सिंचन योजनेत करावा आणि निधीच्या उपलब्धतेसाठी राज्य सरकारने वित्त विभागाची तातडीने सहमती द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.या संदर्भात विखे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निळवंडे धरण आणि कालव्यांच्या कामाची सद्यपरिस्थिती निदर्शनास आणून दिली. निळवंडे धरण्याच्या भिंतीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून उजव्या कालव्याचे काम ११ टक्के आणि डाव्या कालव्याचे ३० टक्के काम पूर्ण झाले असेल तरी दोन्ही कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी ८५० कोटी रुपयांची आवश्यकता असताना राज्य सरकारने अर्थ संकल्पात १० कोटी रुपये व कालव्यांसाठी फक्त ३ कोटी रुपये इतकी अत्यल्प केलेली तरतूद पुरेशी नाही, याकडे विखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे लक्ष वेधले.वास्तविक कालव्याची कामे पूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाच्या ए. आय. बी. पी. योजनेंतर्गत निधी उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्रीय जल आयोगाची सन २०१४ मध्ये मान्यता घेण्यात आलेली आहे. जलआयोगाची मान्यता घेऊन प्रकल्प केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीसमोर प्रस्तावित करण्यासाठी केंद्रीय संचनालयाच्या सतरा प्रकारच्या मान्यता घेण्यासाठी आपण व्यक्तिश: पाठपुरावा करून प्रयत्न केला. राज्य सरकारच्या वित्त विभागाची संमती प्राप्त न झाल्यामुळे निळवंडे प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीसमोर सादर होऊ शकलेला नाही. त्यामुळेच निधीच्या उपलब्धतेसाठी राज्य सरकारने वित्त विभागाची संमती तातडीने द्यावी, अशी मागणी विखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. (तालुका प्रतिनिधी)
प्रधानमंत्री सिंचन योजनेत निळवंडेचा समावेश करा
By admin | Published: May 17, 2016 11:57 PM