शेवगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. शेवगाव-पाथर्डी तालुक्यातही माेठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता रुग्णांना आधाराची गरज आहे. कोरोना सेंटर येथे प्राथमिक सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात. तसेच कोरोना तपासणी चाचण्या वाढवाव्यात अशा सूचना आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासनाला दिल्या.
येथील तहसील कार्यालयात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. राजळे यांनी कोविड केअर सेंटर येथे जाऊन पाहणी केली. त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांशीही संवाद साधला. यावेळी तहसीलदार अर्चना पगिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर काटे, बोधेगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. दीपक परदेशी, सहायक गटविकास अधिकारी बी. ए. कासार, नायब तहसीलदार आर. बी. काथवटे, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, विस्तार अधिकारी एस. व्ही. पाटेकर, डॉ. विजय लांडे, कृष्णा देवढे, सोमनाथ नारळकर आदी उपस्थित होते.
यावेळी बेडची कमतरता लक्षात घेऊन तहसीलदार अर्चना पागिरे यांनी १०० बेड उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर रुग्णांनी पिण्याच्या पाण्याची व सावलीची सोय नसल्याचे लक्षात आणून देताच राजळे यांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्यानंतर मंडप व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. नियोजित त्रिमूर्ती विद्यालयातील कोरोना सेंटरचीही त्यांनी पाहणी केली. लवकरच वाढीव कोरोना लस उपलब्ध होईल.