तळेगाव दिघे : भोजापूर धरणाची उंची तीन मीटरने वाढविण्यात यावी, या मागणीसाठी संगमनेर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोजापूर धरण उंचीवाढ आंदोलनाच्या वतीने बुधवारी सकाळी १० वाजता संगमनेर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, उपोषण करणार असल्याचा इशारा सत्याग्रही नेते अॅड.कारभारी गवळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.भोजापूर धरण १९७२-७३ ला बांधण्यात आले. धरणाचे पाणी सिन्नर व संगमनेर तालुक्यातील लाभार्थी गावांना ६५ व ३५ टक्के दराने देण्याचा निर्णय झालेला आहे. संगमनेर तालुक्यातील निमोण, सोनोशी, नान्नज दुमाला, काकडवाडी, पारेगाव खुर्द, पारेगाव बुद्रुक, तिगाव, तळेगाव दिघे या गावांना पूरचारीने पाणी देण्याबाबत शासकीय निर्णय झालेला आहे. परंतु सिन्नर किंवा संगमनेर तालुक्यातील लाभार्थी पूरचारी गावांना यांचा काही एक फायदा झालेला नाही. कारण मूळच्या योजनेनुसार भोजापूर धरणाची उंची जी ठेवण्याचे नियोजन होते. त्याप्रमाणे उंची ठेवण्यात आलेली नाही. धरणाची उंची तीन मीटर कमी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे भोजापूर धरणांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाणी साठा होतो, असेही गवळी यांनी म्हटले आहे.