तालुक्याची खरीप हंगामाची आढावा बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय काचोळे, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी, तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. खते व बियाणे विक्रेते, तालुका पंचायत समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यात कृषी विस्तार विषयक बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी, हुमणी अळी नियंत्रण, सोयाबीन उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया, मूलस्थानी जलसंधारण, मका पिकावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रण, रासायनिक खत वापरामध्ये दहा टक्के बचत याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. विनाअनुदानित तत्वावर सोयाबीन बीज प्रक्रिया मोहीम यावर आमदार कानडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आमदार कानडे यांनी तालुक्यात शेतकऱ्यांना किती रकमेचा कर्जपुरवठा करण्यात आला, तसेच याबाबत संबंधित बँकांच्या अधिकाऱ्यांकडून तपशील मागविला का? असा प्रश्न कानडे यांनी उपस्थित केला.
तालुक्यात चार स्वयंचलित हवामान केंद्र कार्यरत आहेत, त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे आदेश आमदार कानडे यांनी दिले. प्रत्येक कृषी मंडलामध्ये किमान तीन केंद्र सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करून त्याचा पाठपुरावा करावा असे आदेश कानडे यांनी दिले.