लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव माळवी : बदलत्या जीवनशैलीचे कारण देत वाढत चाललेली व्यसनाधिनता हा केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही चिंतेचा विषय ठरत आहे. तंबाखू, मावा, दारू अशा व्यसनांकडे ग्रामीण भागातील युवक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत. ग्रामीण भागातही कुटुंबातील चारपैकी एक व्यक्ती अशा व्यसनांमध्ये अडकलेला दिसत आहे.
नगर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरील आठ हजार लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव माळवी येथील युवक मोठ्या प्रमाणावर व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या व्यसनाधिनतेमुळे कौटुंबिक कलह, सामाजिक वातावरण बिघडण्याचे काम होत आहे. व्यसनाधिनतेमुळे किमान दररोज दोनशे ते तीनशे रूपये खर्च करणारा युवक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. व्यसनाधिनतेमुळे युवकांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असून, बहुतांशी युवकांनी शिक्षण अर्धवट सोडले आहे. विविध व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे अल्पावधीतच युवावर्ग मोठ्या प्रमाणात विविध आजारांना बळी पडत आहे. पिंपळगाव माळवी परिसरामध्ये अवैध दारू विक्रीही मोठ्या प्रमाणात सुरू असून, स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध दारू, गुटखा यासारख्या व्यसनांच्या पुरवठ्याला चाप लागत नसल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे.
वाढत्या व्यसनाधिनतेमुळे घरातील महिला व मुलांवर विपरीत परिणाम होत असून, त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. युवकांमध्ये असलेली ऊर्जा या व्यसनाधिनतेमुळे विधेयक कामासाठी उपयोगात येण्याऐवजी अनावश्यक कामातच खर्ची पडत आहे.
---
युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे सहज उपलब्ध होणारी व्यसनाची साधने आहेत. विविध माध्यमांद्वारे अशा गोष्टींचे होणारे उदात्तीकरण युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. याबाबत पालकांनी जागरूक राहून आपल्या पाल्यांशी मैत्रीचे संबंध ठेवत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत.
- डॉ. कैलास झालानी,
मानसोपचार तज्ज्ञ, नगर
---
पिंपळगाव माळवी परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. युवकांनी आपली ऊर्जा व्यसनाधिनतेऐवजी विधायक कामात वापरावी.
- युवराज आठरे,
सहाय्यक निरीक्षक, एमआयडीसी पोलीस ठाणे