अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबची क्षमता आता प्रतिदिन एक हजार चाचण्या एवढी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सोमवारी दिली.
अधिकाधिक चाचण्या करून बाधितांना लवकर शोधण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्याचाच भाग म्हणून चाचण्यांचा वेग वाढणार आहे. ज्यांना आजाराची लक्षणे असतील, बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील असतील अथवा इतर गंभीर आजारांनी त्रस्त असतील अशा व्यक्ती त्यांच्या घशातील स्त्राव जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी देऊ शकणार आहेत. अशा व्यक्तींनी त्यांचे स्त्राव तपासणी जिल्हा रुग्णालयात करावी.
सध्या जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने 'चेस द व्हायरस' हे लक्ष्य ठेऊन रुग्णांपर्यंत पोहोचण्याची मोहीम आखली आहे. यासंदर्भात आरोग्य यंत्रणा आणि सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत. रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून ही मोहीम गतिमान झाली आहे. आता जिल्हा रुग्णालयातील लॅबची क्षमता वाढल्याने प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना अधिक गती मिळणार आहे.
ज्यांना लक्षणे नाहीत, अशा कोरोना बाधित रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात येण्याएवजी त्यांच्या जवळच्या तालुकास्तरीय किंवा महानगरपालिका क्षेत्रातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहनही व्दिवेदी यांनी केले आहे.