अहमदनगर : मुले आणि युवकांमध्ये जीवन जगताना सातत्याने मोबाईल, सोशल मीडिया, बाहेरच्या जगातील व्यत्यय मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहेत. त्यामुळे एकाग्रतेची पातळी कमी झाली आहे. ही पातळी वाढविण्यासाठी ध्यान-धारणा-व्यायाम आवश्यक आहे. त्याकडे तरुणांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नाशिक येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे युवा विंगचे प्रशिक्षक चिराग पाटील यांनी केले.
नगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी ऑनलाईन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. नगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक कृष्णा पेंडम यांच्या पुढाकाराने आयोजित ऑनलाईन व लाईव्ह संवादात पालक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पाटील म्हणाले, तरुणामध्ये मोठी ऊर्जा आहे. ती योग्य दिशेला वळविण्याची खरी गरज आहे. त्या ऊर्जेचे ऊपांतर कौशल्यात करून त्याला अध्यात्माची जोड हवी आहे. बेरोजगारी ही समस्या नसून कौशल्यपूर्ण विकास नसणे हीच खरी समस्या आहे. त्यासाठी तरुणांना कौशल्याचे प्रशिक्षण देवून त्यांच्या कौशल्याचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिरांच्या माध्यमातून काम करीत आहे. ऑनलाईन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचे मन लागले जात नाही, असा आरोप पालक करतात. मात्र, २० मिनिटांपेक्षा जास्त काळ ऐकण्याची क्षमता नसते. ती वाढविण्यासाठी एकाग्रतेवर भर द्यावा. विकास करताना संस्कार आणि संस्कृती याचा विसर पडू देऊ नका, असाही सल्ला त्यांनी दिला.
नगर येथील समन्वयक पेण्डम यांनी गेल्या दहा महिन्यांपासून ऑनलाईन वर्ग घेत आहेत. आतापर्यंत या वर्गात महाराष्ट्र व बाहेरील नामवंत प्रशिक्षकांनी ऑनलाईन संवाद साधला आहे. रविवारी झालेल्या संवादसत्रात मराठवाडा विभागाचे शरद डोलारकर, नागपूर येथील व्यसनमुक्ती केंद्रातून अर्चना भारती यांनीही सहभाग घेतला होता.
---
फोटो- १० चिराग पाटील