अहमदनगर : जुन्या साठविलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचे वाढीव काम केल्याबद्दल ठेकेदाराने तब्बल ५९ लाखांचे बिल महापालिकेला सादर केले आहे. ठेकेदाराला यापूर्वी ३ कोटी ६७ लाखांचे बिल देण्यात आले आहे. त्यानंतर, ठेकेदाराने पुन्हा वाढीव बिल सादर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या बुरुडगाव येथील जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचे काम ठेकेदाराला देण्यात आले होते. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ४ कोटी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले होते. सुमारे १ लाख क्युबिक मीटर जुना कचरा डेपोत साचलेला होता. या कामाचे प्रति क्युबिक मीटर ३६७ रुपये याप्रमाणे ठेकेदाराला ३ कोटी ६७ लाखांचे बिल यापूर्वी अदा केले आहेत. विशेष म्हणजे, हे बिल अदा करताना त्रयस्थ संस्थेकडून कामाचे मोजमाप करण्यात आले होते. त्या आधारे वरील बिल ठेकेदाराला देण्यात आले. हे बिल मिळाल्यानंतर ठेकेदाराने १५ हजार क्युबिक मीटर वाढीव काम झाले आहे. या कामाचे ५९ लाखांचे बिल मिळावे, अशी मागणी महापालिकेकडे केले. वास्तविक पाहता, एका कामाची दोन वेळा तपासणी करून बिल देता येते का, हाही प्रश्नच आहे. असे असताना स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांनीही ठेकेदाराची मागणी मान्य करत, प्रस्ताव स्वीकारला व तो वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविला होता, परंतु लेखा परीक्षण विभागाने हे बिल २५ लाखांहून अधिक रकमेचे असल्याने स्थायी समितीची मंजुरी घ्यावी लागेल, असा अभिप्राय नोंदविला आहे.
जुन्या कचऱ्यावर विल्हेवाट न लावता, ठेकेदाराने काही कचरा शेतकऱ्यांच्या शेतात टाकला. यामुळे झालेल्या प्रदूषणास महापालिकेला जबाबदार धरण्यात आले आहे. तसे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला दिलेले आहेत. मात्र, कचरा टाकल्याबाबत शेतकऱ्यांची तक्रार नाही, असे कारण देत पालिकेने ठेकेदारावर कारवाई करणे टाळले आहे, परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही बाब गांभीर्याने घेतली असून, वरिष्ठ कार्यालयास कळविलेले आहे.
.....
- ठेकेदाराने शेतकऱ्यांच्या शेतात कचरा टाकल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याबाबत पालिकेला पत्र आलेले नाही. त्यामुळे बिल देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
- डॉ.शेडाळे, आरोग्य अधिकारी, स्वच्छता विभाग