श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव येथे कोरोना संक्रमणाचे तीन रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासन हादरले आहे. गावातील संक्रमितांची साखळी तोडण्याकरिता तीनही रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. विलगीकरण कक्षामध्ये दोन रुग्ण आढळून आल्यामुळे इतर २३ व्यक्तींचा कक्षातील मुक्काम वाढणार असून त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
वडाळा महादेव येथे एका आश्रमातील महाराज तसेच विलगीकरण कक्षामध्ये असलेल्या मुंबई येथील पती-पत्नीला कोरोनाची बाधा झाली आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा महिलेचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला होता.
दरम्यान, पती-पत्नीच्या संपर्कातील कुटुंबातील सहा सदस्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली. याशिवाय विलगीकरण कक्षामध्ये असलेल्या इतर २३ जणांना दूरचे संपर्कातील व्यक्ती गृहीत धरून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाईल तसेच त्यांच्यातील लक्षणांची बारकाईने नोंद केली जाईल, अशी माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.
विलगीकरण कक्षांमध्ये दोन रुग्ण आढळून आल्यामुळे इतर सर्व २३ जणांचा तेथील मुक्काम सात दिवसांकरिता वाढला आहे. वडाळा महादेव येथे बुधवारी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. व्यावसायिकांनी व ग्रामस्थांनी स्वत:हून त्याकरिता पुढाकार घेतला आहे.