सध्या राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या महामारीत अनेकांचा मृत्यू झाला असून, कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो शेअर करून या मुलांना दत्तक घेण्याचे आव्हान केले जात आहे. अशा मेसेजच्या माध्यमातून फसवणूक होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून महिला व बालविकास विभागाने आव्हान केले आहे की, सामाजिक प्रसारमाध्यमाचा उपयोग करून अवैधरीत्या मुले परस्पर दत्तक देण्यासंदर्भात मॅसेज फिरत आहेत. सध्या कोरोना अथवा इतर कोणत्याही कारणामुळे मुलांच्या पालकांचा मृत्यू झाला असेल आणि त्या बालकांना नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा बालकांच्या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या १० ९८ या हेल्पलाइन क्रमांकावर अथवा जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुधीर पाटील, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी वैभव देशमुख, संरक्षण अधिकारी सर्जेराव शिरसाठ, बालकल्याण समितीचे सदस्य प्रवीण मुत्याल यांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
.......
अनाथ मुलांना दत्तक घ्यावे, अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. मुले दत्तक घेण्याची एक विशिष्ट प्रशासकीय प्रक्रिया असते. अशा पद्धतीने कुणालाही मुलांना दत्तक घेता येत नाही तसेच अशा पोस्टच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनाथ मुलांच्या संदर्भात पोस्ट व्हायरल न करता महिला व बालविकास विभागाची संपर्क करावा.
- वैभव देशमुख, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी