प्रशांत शिंदे/अहमदनगर- विद्यमान लोकप्रतिनिधींना आपला फोटो आणि नाव टँकरवर टाकण्याचा हव्यास आहे. परंतु आचारसंहितेच्या कालखंडात प्रशासनाने याला विरोध केला. आपली ही चूक लपवण्यासाठी त्यांनी माझ्यावर टीका करण्याचा बालिश प्रयत्न केला. आम्ही देखील कर्जत-जामखेडमध्ये कर्तव्य समजून पाणी पुरवठा केला पण प्रसिद्धी दिली नाही, अशी टीका आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली.
कुकडीचे आवर्तन दोन-तीन दिवसांत सुटेल. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा, शेतीचा आणि चाऱ्याचा प्रश्न सुटले, असेही त्यांनी सांगितले. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा ३१ मे रोजी २९९ वा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राम शिंदे बोलत होते.
मागील काही कार्यक्रमात आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात श्रेयवाद रंगला होता. यावरुन आरोप प्रत्यारोप झाले होते. यंदा होणाऱ्या जयंतीच्या कार्यक्रमापूर्वीच राम शिंदे म्हणाले की चौंडीत कोणातेही वाद होत नाहीत. चौंडी माझे गाव आहे. शिंदे परिवारातील मी एक घटक आहे. मी चौंडीचा सरपंच राहिलो, आमदार, पालकमंत्री राहिलो आहे परंतु २०२२ च्या जयंती कार्यक्रमात मनाचा मोठेपणा न दाखवता प्रशासनाने कार्यक्रम पत्रिकेत माझे नावही टाकले नाही.
पत्रिकेत नाव नव्हते याची मला अडचण नव्हती पण मला बोलावले देखील नाही. मला माझ्या घरात स्थानबद्ध करुन ठेवले. परंतु मी प्रमाणिकपणे अहिल्यादेवी होळकरांची सेवा केली आहे. त्या कार्यक्रमानंतर पुढील ३० दिवसांत आमदार झालो. पूर्वी देखील आणि आता देखील मी जयंतीच्या कार्यक्रमात भाग घेतला आहे. यावेळी आम्ही रोहित पवारांचे नाव पत्रिकेत टाकले आहे.