अहमदनगर : एकच मिशन-जुनी पेन्शन, अशा घोषणा देत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून पेन्शनची मागणी केली. मंगळवारी सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी एकच मिशन-जुनी पेन्शन असे लिहिलेल्या टोप्या डोक्यात घालून आंदोलनात सहभागी झाले होते. सावेडीतील आनंद शाळेजवळून शिक्षकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाले होते. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.
महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, आदर्श बहुजन शिक्षक संघ, ईबटा कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य ग्रेड पात्र मुख्याध्यापक संघ, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अपंग कर्मचारी संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघ, अहमदनगर जिल्हा शिक्षक परिषद, नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ, उर्दू शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, पदवीधर शिक्षक संघटना, एकल शिक्षक मंच, आरोग्य कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना अश्या विविध कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाल्या आहे. शासकीय कार्यालये, शाळांमध्ये शुकशुकाट
शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांनी संप पुकारल्यामुळे शासकीय कार्यालये ओस पडल्याचे दिसून आले. सर्व शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.