अहमदनगर : राज्यातील नायब तहसीलदारांना सध्या मिळत असलेली ग्रेड पे ही वर्ग ३ ची असून, पद मात्र वर्ग २ आहे. त्यामुळे सर्व नायब तहसीलदारांना वर्ग २ची ४ हजार ८०० ही ग्रेड पे मिळावी, या मागणीसाठी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
सोमवारी (दि.३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजय तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने निदर्शने करुन बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनात म्हटले आहे, राज्य शासनाकडे वारंवार वाढीव ग्रेड पे बाबत पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु शासनाने अद्याप दखल घेतली नाही.
तसेच के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील वेतनत्रुटी समितीसमोर सादरीकरण करुनही संघटनेच्या मागण्यांचा विचार करण्यात आलेला नाही. नायब तहसीलदार हे राजपत्रीत वर्ग २ चे पद असून, त्याचा ग्रेड पे ४८०० करण्यात यावा, अशी संघटनेची मागणी आहे. या मागणीसाठी राज्यभर ३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर किशोर कदम, वैशाली आव्हाड, माधुरी आंधळे, सुनिता जऱ्हाड, वरदा सोमण, पुनम दंडिले, शाम वाडकर, एफ. आर. शेख, अभिजीत बारवकर, दत्तात्रय भावले, योगेश कुलकर्णी, अभिजीत वांढेकर, चंद्रशेखर शितोळे, रोहिदास वारुळे, अविनाश रणदिवे, व्ही. व्ही. भांबरे, गणेश आढारी, शंकर रोडे, सुधीर उबाळे, राजू दिवाण, प्रकाश बुरुंगले, किरण देवतरसे, सुरेश वाघचौरे, प्रकाश मोरे, कैलास साळुंके आदींची नावे आहेत.