Shrigonda Vidhan Sabha ( Marathi News ) : महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे श्रीगोंद्यातील अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून नुकतंच निलंबित करण्यात आलं. मात्र तरीही माझी निष्ठा शरद पवार यांच्यावरच असल्याचं जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. "मला पक्षातून निलंबित करण्यात आले असले तरी माझी निष्ठा शरद पवार यांच्यावरच आहे. विधानसभेचा निकाल लागला की, मी पवार साहेबांना पाठिंबा देणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मला मंत्रीपद नको त्याऐवजी डिंबे माणिकडोह बोगदा, साकळाई योजना आणि एमआयडीसीचे दान मागणार आहे," अशी भूमिका अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी श्रीगोंदा येथे सोमवारी प्रचार सांगता सभेत मांडली.
जगताप म्हणाले, "२०२४ च्या निवडणुकीत आपली उमेदवारी निश्चित होती, मात्र इथल्या जागेचा काही दलालांनी सौदा केला. आज सांगता सभेला लोटलेला जनसागर हा विजयाची नांदी ठरणार आहे." माजी उपनगराध्यक्षा ज्योती खेडकर म्हणाल्या, उमेदवारी नाकारूनही राहुल जगताप यांनी अपक्षाची ताकद काय असते हे आज दाखवून दिले आहे.
दरम्यान, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी हरिदास शिर्के, राजेश परकाळे, टिळक भोस, अनिल ठवाळ, गंगाराम दरेकर, केशव मगर, शुभांगी पोटे, प्रकाश पोटे, स्मितल वाबळे, डॉ. प्रणोती जगताप, ज्योती खेडकर, दादासाहेब औटी, शिवप्रसाद उबाळे, श्याम जरे, अजित जामदार, संजय जामदार, अतुल लोखंडे, मोहन आढाव, विकास आढाव, गौरव पोखरणा, उत्तम डाके, अख्तार शेख, बाबा जगताप, बाळासाहेब उगले, अजीम जकाते आदी उपस्थित होते.
मला आमदाराची आई करा
"दिवंगत कुंडलिकराव जगताप यांनी सन २०१४ रोजी आवाहन केले होते की, मला तुम्ही आमदाराचा बाप करा आणि तुम्ही त्यांचा शब्द खरा केला. आता तुम्ही मला आमदाराची आई करा," अशी भावनिक साद सभेत राहुल जगताप यांच्या मातोश्री अनुराधा जगताप यांनी घातली.