अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चाचण्यांचा वेग वाढला आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेवरच संपूर्ण जिल्ह्याचा भार आहे. शहरातील चाचण्या वाढविण्यावर भर देण्यात येणार असून, तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळांची चर्चा सुरू आहे, अशी माहिती आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.
नगर शहरात गुरुवारी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ही संख्या कमी झाली. शहरातील महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रांत स्रावाचे नमुने घेऊन ते येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले जातात. परंतु, तिथे त्याच दिवशी तपासणी होत नाही. त्यामुळे अहवाल येण्यास विलंब होतो. त्यात शहरातील चाचण्या वाढविण्यावर महापालिका भर देणार आहे. त्यामुळे स्वतंत्र चाचणी केंद्र सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. नागरिकांची चाचणी या केंद्रात मोफत केली जाईल. नाशिक येथील खासगी प्रयोगशाळेशी याबाबत प्राथमिक चर्चा झाली. इतरही काही प्रयोगशाळांशी चर्चा केली जाणार असल्याचे गोरे म्हणाले.
महापालिकेने लॉकडाऊन काळात रामकरण सारडा विद्यार्थी वसतिगृहात कोविड चाचणी केंद्र सुरू केले होते. या केंद्रात नमुने घेऊन ते विखे फाउंडेशन संचलित प्रयोगशाळेत पाठविले जात होते. त्या बदल्यात महापालिकेने प्रतिचाचणीचे शुल्कही संबंधित संस्थेला अदा केले. रुग्णसंख्या वाढत असल्याने चाचण्या वाढविण्यासाठी प्रयोगशाळांशी महापालिकेची चर्चा सुरू आहे.
........
अँटिजन किटद्वारे चाचणी
शहरात सामाजिक संस्थेच्या मदतीने अँटिजन किटद्वारे नागरिकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. महापालिकेच्या तीन आरोग्य केंद्रांतही ही चाचणी करण्यात येत असून, ज्या भागात रुग्ण सापडतील त्या भागातील नागरिकांच्या कोविड चाचण्या करण्यात येणार आहेत.