पारनेर : चौथ्यांदा विधानसभेत जाण्याच्या तयारीत असलेले पारनेरचे शिवसेना आमदार विजय औटी यांना बुधवारी माजी शिवसेना तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी अपक्षांच्या मदतीने पराजयाचा जोरदार हादरा देत पारनेर नगरपंचायतीमध्ये परिवर्तन घडविले. त्यानुसार अपक्ष वर्षा नगरे नगराध्यक्षपदी तर शिवसेना बंडखोर चंद्रकांत चेडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली.शिवसेनेचे दोन व सहयोगी अपक्ष दोन नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने औटी यांच्या गटाला जोरदार धक्का बसला. पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी बुधवारी निवड झाली़ प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या वैशाली औटी व विरोधकांतर्फे अपक्ष वर्षा नगरे तर उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दत्तात्रय कुलट व शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक चंद्रकांत चेडे यांनी अर्ज दाखल केले होते़ सेनेच्या सुरेखा भालेकर व चेडे यांना डावलण्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या दोघांनीही बंडाचा झेंडा फडकविला. त्यांनी सेनेचे नंदकुमार देशमुख, विशाल शिंदे यांच्याबरोबरच अपक्ष शशीकला शेरकर, काँग्रेसचे मालन शिंदे, राष्ट्रवादीचे विजेता सोबले, संगीता औटी यांना स्वत:कडे ओढून सहलीवर पाठविले.सेनेत बंडाळी झाल्याने आमदार औटी गटात अस्वस्थता होती़ बुधवारी सकाळी दहा वाजता विरोधी गटाचे दहा नगरसेवक पारनेरमध्ये दाखल झाले़ त्यांनी यंत्रणा दक्ष ठेवल्याने इतर नगरसेवकांबरोबर संपर्क करण्यात सेनेला अपयश आले़ दुपारी दोन वाजता निवडीसाठी बैठक झाल्यावर नगराध्यक्षपदासाठी मतदान होऊन अपक्ष वर्षा नगरे यांना नऊ, सेनेच्या वैशाली औटी यांना सात मते पडली़ सेनेचे बंडखोर गटात गेलेले नगरसेवक नंदकुमार देशमुख गैरहजर राहिले.प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद दाणेज यांनी नगराध्यक्षपदी वर्षा नगरे व उपनगराध्यक्षपदी चंद्रकांत नगरे यांची निवड जाहीर केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पारनेर शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़मित्रांची जोडी ठरली किंगमेकरआमदार औटींना शह देण्यासाठी नगरसेविका सुरेखा भालेकर यांचे पती अर्जुन भालेकर व नगरसेवक चंद्रकांत चेडे या दोन मित्रांनी केलेल्या बंडाला भाजपचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे व पारनेर बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड या दोन मित्रांनी नियोजनाची साथ दिल्याने या दोन्ही जोड्या किंगमेकर ठरल्या. शिवाय आमदार औटी यांच्याच गटात बंडखोरी होत असल्याचे लक्षात येताच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे सुजित झावरे, शिवसेनेचे माजी तालुकापमुख निलेश लंके यांनीही त्यांना साथ दिली. तालुक्यातील विरोधक आमदार औटी यांच्या विरोधात एकवटल्याचे दिसून आले.