केडगाव : नगर तालुका पंचायत समितीवर गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असून आता सहाव्यांदा पंचायत समितीवर भगवा फडकण्याचे संकेत आहेत.
शुक्रवारी (दि.२६) सभापती, उपसभापतीपदांसाठी निवडणूक होणार आहे. नगर पंचायत समितीच्या सभापती कांताबाई कोकाटे व उपसभापती रवींद्र भापकर यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. सव्वा-सव्वा वर्षांच्या फॉर्मुल्याच्या अंमलबजावणीसाठी कोकाटे व भापकर यांनी पक्षश्रेष्ठींना दिलेला शब्द पाळत आपापल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षश्रेष्ठी व प्रशासनाने त्यांचे राजीनामे मंजूर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सभापती व उपसभापती पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयात दोन्ही पदांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी शुक्रवारी सकाळी १० ते १२ पर्यंत नामनिर्देशन पत्र भरणे, छाननी व माघारीची प्रक्रिया पार पडणार असून दुपारी दोन वाजता विशेष सभा घेऊन सभापती व उपसभापती निवडले जाणार आहेत.
नगर तालुक्यात २००७ च्या जिल्हा परिषद निववडणुकीत शिवसेना, कॉंग्रेस यांची महाआघाडी तयार झाली होती. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी तालुक्यातील राजकीय पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी या महाआघाडीला तालुक्यातील जनतेने डोक्यावर घेत निर्विवाद बहुमत मिळवून दिले. तेव्हापासून एक वेळचा अपवाद सोडला तर तालुक्यात सेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येत महाआघाडी स्थापन करूनच निवडणुका जिंकल्या. यामुळे माजी सभापती नलिनी पाखरे यांचा अपवाद सोडला तर गेल्या पंधरा वर्षांत पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकत राहिला.
सध्या पंचायत समितीत शिवसेनेचे ७, कॉंग्रेसचा १, भाजपचे ४ सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. सेना-कॉंग्रेस यांची आघाडी असल्याने त्यांच्या जागा ८ होतात. त्या भाजपच्या संख्येपेक्षा दुप्पट आहेत.
यावेळीही महाआघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने व कॉंग्रेसच्या एकमेव सदस्याला उपसभापती पदाची संधी मिळाली होती. त्यामुळे आता दोन्ही जागांवर शिवसेनेची वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सभापतीपद महिला राखीव असल्याने यासाठी शिवसेनेच्या सुरेखा गुंड यांची तर उपसभापतीपदासाठी सेनेचेच डॉ. दिलीप पवार यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचा निर्णय मागील निवडीच्या वेळीच जाहीर करण्यात आला होता. तथापि, असे असले तरी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात. तसेच कोणत्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव होते. याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. मात्र, यंदा सहाव्यांदा पंचायत समितीवर भगवा फडकेल, असे सध्याचे राजकीय चित्र आहे.
---
विरोधक काय करणार?
मागील वेळी १२ पैकी केवळ ४ सदस्य भाजपकडे असतानाही तालुक्यातील भाजप नेत्यांनी सेना-कॉंग्रेसमधील नाराजांवर लक्ष ठेवून आपल्या पदरात काही पडेल का याची चाचपणी केली. यावरून तालुक्यात गुप्त बैठका घडल्याच्या चर्चा झाल्या. मात्र, महाआघाडी अभेद्य राहिल्याने भाजपचा डाव फसला. यावेळी ते पुन्हा डाव टाकतील का अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.
--
पंचायत समितीत शिवसेना-कॉंग्रेसची महाआघाडी असून आमचे स्पष्ट बहुमत आहे. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड दोन्ही पक्षातील श्रेष्ठींच्या निर्णयानुसारच होणार आहे. विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होईल.
-संदेश कार्ले,
उप जिल्हाप्रमुख, शिवसेना