अहमदनगर : निवृत्ती महाराज इंदुरीकर वादाच्या भोव-यात सापडल्यानंतर प्रथमच नगरमधील भिंगार शहरात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक तैनात केले होते. कीर्तन चालू असताना त्यांनी शूटिंगलाही बंदी घातली होती. या वादाचा मला व माझ्या कुटुंबीयांना मोठा त्रास झाल्याचे इंदोरीकर यांनी यावेळी सांगितले. गर्भलिंग निदानाबाबत केलेल्या वक्तव्य केल्याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या गर्भलिंग निदान विरोधी समितीने त्यांना नोटिस बजावलेली आहे. या पार्श्वभूमीवर इंदोरीकर महाराज यांचा प्रथमच शनिवारी (दि.१५ फेब्रुवारी) भिंगार येथे कीर्तनाचा जाहीर कार्यक्रम झाला. भिंगार येथील शुक्लेश्वर मंदिरात त्यांचे कीर्तन झाले. यावेळी व्हिडीओ शुटींग बंद झाल्याशिवाय कीर्तन करणार नाही, अशी सूचनाच त्यांनी आयोजकांना दिली होती. त्यामुळे कॅमेरे हटविल्यानंतर महाराजांनी कीर्तन सुरू केले. खासगी सुरक्षा रक्षक प्रथमच तैनात करण्यात आले होते. कीर्तन झाल्यानंतर ते म्हणाले, या वादाचा मला व माझ्या कुटुंबीयांना मोठा त्रास होत आहे. माझी मुलगी देखील शाळेत गेली नाही. माझ्या वक्तव्याचा महिलांना त्रास झाला असेल तर मी सर्वांची माफी मागतो. भागवत, ज्ञानेश्वरी, गीता आदी धार्मिक व पौराणिक जग्मान्य आहेत. या ग्रंथातील ज्ञान मी कीर्तनातून सांगत असतो. त्यामुळे ते चुकीचे कसे असेल? असा सवालही इंदोरीकर यांनी केला.
इंदुरीकर म्हणाले, वादाचा मला व माझ्या कुटुंबीयालाही त्रास; शूटिंगलाही घातली बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 1:55 PM