अहमदनगर : सह्याद्रीच्या कुशीत असलेला लिंगाण्याचा गगनचुंबी सुळका पाहूनच अनेकांच्या मनात धडकी भरते. हा किल्ला सर करणे म्हणजे, ट्रेकर्ससाठी मोठे आव्हान असते. मात्र नगर येथील इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपने हा सुळका सर करण्याची मोहीम यशस्वी केली.
लिंगणा सुळका हा तीन हजार फूट उंचीचा असून ट्रेकर्सच्या दृष्टीने अत्यंत अवघड समजला जातो. किल्ल्यावर फक्त दोराच्या साह्यानेच चढता येते. या सुळक्याला सर करायला चार तास लागतात. नगरमधील इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपने नवीन वर्षाची सुरुवात लिंगाणा मोहिमेने केली. ३ जानेवारीला पहिली बॅच, १० जानेवारीला दुसरी आणि १७ जानेवारीला तिसरी बॅच असे प्रत्येक बॅचमध्ये २० ट्रेकर्स सहभागी होते. सलग तीन रविवार तीन बॅच मिळून एकूण ६३ ट्रेकर्सनी लिंगाणा सुळका यशस्वीरीत्या पूर्ण केला.
लिंगाणा सुळका महाडपासून ईशान्येस १६ मैलावर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व राजगड यांच्यादरम्यान आहे. शिस्तबद्ध नियोजन, प्रस्तावरोहण साहित्य (सुळक्यावर चढण्याचे साहित्य) व ट्रेकर्सची साथ यामुळे इंद्रप्रस्थ ट्रेकर्सची लिंगाणा चढाई मोहीम यशस्वी झाली. ट्रेकर्सना अनिल वाघ, वैभव लोटके यांच्यासह महेश जाधव, प्रथमेश ढेरे, प्रवीण पवार आणि मयूर म्हस्के यांनी सहकार्य केले.
--
फोटो- २१ इंद्रप्रस्थ ट्रेकर्स
नगर येथील इंद्रप्रस्थ ट्रेकर्स यांनी लिंगाणा सुळका चढण्याची यशस्वी कामगिरी केली. त्यानंतर जल्लोष करताना ट्रेकर्स.