अहमदनगर : श्रीरामपूर, शिर्डी, नाशिक, पुणे, मुंबई तसेच इतर जिल्ह्यात खून, दरोडा, खंडणी व मोक्कांतर्गत गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार चन्या बेगसह तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी दुपारी जेरबंद केले.चन्या ऊर्फ सागर अशोक बेग व त्याच्या साथीदारांची श्रीरामपुरात मोठी दहशत आहे. चन्यावर श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव, नाशिक, पुणे, मुंबई अशा विविध पोलीस ठाण्यांत खून, दरोडा, खंडणी, सोनसाखळीच्या चो-या असे एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सर्वच पोलीस त्याच्या मागावर होते. गेल्या आठ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत त्याची गुन्हेगारी सुरूच होती. खब-याच्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चन्या बेग व त्याच्या टोळीचा छडा लावला. शुक्रवारी (दि. १३) चन्या व त्याचे साथीदार नगरमध्ये येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह पथकाने शुक्रवारी दुपारी नगर-दौंड रस्त्यावर अरणगाव येथे सापळा लावला. दुपारी एकच्या सुमारास चन्या बेगच्या कारचा वेग अरणगाव येथे गतिरोधकावर मंदावला़ त्याचवेळी पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले़ या कारमधील चन्या बेग, आकाश ऊर्फ टिप्या अशोक बेग, सागर साहेबराव शिंदे (सर्व रा. श्रीरामपूर) असे तिघेजण पोलिसांच्या हाती लागले़ त्याचवेळी त्याच्या इतर साथीदारांची एक कार मागून येत होती, परंतु पोलिसांना पाहून धूम ठोकली. पळून गेलेल्या आरोपींत अर्र्जुन खुशाल दाभाडे, लखन प्रकाश माखिजा, सागर काशीनाथ शेटे, रितेश आसाराम काटे, सुधीर काळोखे यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी चन्या बेगसह आरोपींकडून स्कोडा कंपनीची कार (एमएच १२-एचएल ७९२६), एक गावठी कट्टा व एक जीवंत काडतूस, तसेच वेगवेगळ्या कंपनीचे १३ मोबाईल फोन असा ८ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर नगर व मुंबई पोलिसांकडून मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
आरोपींच्या कारवर पोलिसांचा लोगो
चन्या बेगची जी स्कोडा कार पोलिसांनी पकडली त्यावर पोलिसांचा लोगो लावलेला होता. त्यामुळे त्याची गाडी सहसा कोणी अडवत नव्हते. पोलिसांचा लोगो असल्याने हे गुन्हेगार राज्यभर मोठ्या सहजतेने वावरत होते. याशिवाय यातील दुसरा आरोपी टिप्या उर्फ आकाश बेग याच्याकडे सापडलेल्या वाहन परवान्यावर छायाचित्र त्याचे मात्र नाव दुस-याचेच होते.