लोकमत न्यूज नेटवर्क
शेवगाव : शहरासह तालुक्यातील १०१ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव करुन ग्रामीण भागातील आपला विळखा घट्ट केला आहे. मात्र, याही परिस्थितीत १२ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे. तालुक्यात मार्च ते २६ एप्रिल या कालावधीत ३ हजार ३८७ जण कोरोनाबाधित झाले असून, ३९ जणांना जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाचा कहर सुरू असतानाही नागरिक बेफिकिरीने वावरत आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या तळीरामांना अटकाव करण्यासाठी तसेच गावपातळीवर प्रभावीपणे नियोजन करण्यासाठी तालुक्यातील ९४ गावांमध्ये सात सदस्यीय कोरोना समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्यसेवक व सेविका तसेच प्राथमिक शिक्षकांना समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक, दुकानदार सर्रासपणे कोरोनाला रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत घालण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक शहरात खरेदीसाठी येऊन कोरोना संसर्गाचे लोण गावाकडे घेऊन जात आहेत.
मागील कोरोना लाटेत सुरक्षित वाटणारी खेडी, वाड्या, वस्त्यांवर कोरोनाने यावेळी दस्तक दिली आहे. आता शहराप्रमाणे ग्रामीण भागही सुरक्षित राहिलेला नाही. त्यामुळे बहुतांश ग्रामस्थ कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शेतशिवारात तात्पुरते स्थलांतरित झाले आहेत. सरकारने निर्धारित केलेल्या वेळेत सकाळच्या सत्रात गर्दी होत आहे. सर्वाधिक १ हजार २३२ रूग्ण हे शहरात आढळले आहेत.
गतवर्षीच्या लाटेत १८ जणांचा कोरोनाने बळी घेतला होता तर दुसऱ्या लाटेत अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
--
सध्या ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्यामुळे लक्षणे तीव्र होण्याअगोदर, प्राथमिक स्तरावर लक्षणे दिसून येताच तत्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करुन औषधोपचार करुन घ्यावेत. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास घरीच उपचार न घेता, कोविड केअर सेंटरमध्ये भरती व्हावे.
- अर्चना पागिरे,
तहसीलदार, शेवगाव.