नेवासा : तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. सुमारे ४० गावात कोरोनाने शिरकाव केला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी ४० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३१ जुलैपर्यंत आढळलेल्या २१९ बाधितांपैकी २१ ते ४० वयोगटातील तब्बल ९६ रुग्ण असल्याचे तालुका आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यातील तब्बल ९६ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत. यासोबतच ० ते २० वयोगटातील ३६ रुग्ण आहेत. ४१ ते ६० वयोगटातील ६३ रुग्ण, ६१ ते ८० वयोगटातील २३ रुग्ण आणि ८० वर्षांवरील १ रुग्ण आतापर्यंत तालुक्यात आढळून आले आहेत. विशेष म्हणजे संपर्कातून बाधित वाढत असल्यामुळे आता तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
१९ मार्च ते ३१ जुलै दरम्यान तालुक्यातील तब्बल चाळीस गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. यात अद्याप २१९ रुग्ण संक्रमित झाले असून त्यातील ५१ म्हणजेच १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर ४७ म्हणजेच १०३ रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात आजपर्यंत पाच रुग्ण दगावले आहेत.
मृत्यूचे प्रमाण २.२८ टक्के इतके आहे. मागील पाच महिन्यात जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात १०४, खाजगी रुग्णालयातून आलेल्या अहवालात १९ तर रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ९६ रुग्ण कोरोना बाधीत आढळले आहे.
बाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक असून कोरोना विषाणूचा संसर्ग लहान बालके,वयोवृध्दांनाही झाला आहे. पुरुषांसोबत महिलाही या आजाराला बळी पडल्या आहेत. ३१ जुलैपर्यंतच्या एकूण बाधितांपैकी ७२ टक्के रुग्ण पुरुष आहेत. एकूण २१९ रुग्णांपैकी १५७ रुग्ण हे पुरुष आहेत तर ६२ रुग्ण महिला आहेत.