अहमदनगर : बोल्हेगाव येथील शिवसेनेचे (शिंदे गट) स्विकृत नगरसेवक मदन आढाव यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिल्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेविका कमल सप्रे यांनीही आरक्षणाला पाठिंबा म्हणून मंगळवारी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.
यावेळी नगरसेविका सप्रे यांच्यासमवेत त्यांचे पती माजी नगरसेवक दत्ता सप्रे उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना दिलेल्या राजीनामापत्रात सप्रे यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. आरक्षणासाठी अनेक ठिकाणी मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांचे बलिदान वाया जऊ नये, तसेच मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे. सकल मराठा बांधव गेली ४० वर्षे आरक्षणासाठी लढा देत आहेत.
राज्यकर्ते मात्र, मराठा समाजाचा केवळ राजकारणासाठीच वापर करत आहेत. समाजबांधवांवर होणारा अन्याय आता सहन होत नाही. या अन्यायाविरोधात लढण्यासाठी राजीनामा देत आहे. नागापूर-बोल्हेगाव परिसरात विकासकामे होत नसल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पदाचा राजीनामा देत आहे. मात्र, नागापुर-बोल्हेगांव व उपनगर परिसरातील नागरिकांच्या समस्या सुख-दुखा: साठी मी प्रामाणिक पणे काम करणार असल्याचे सप्रे यांनी या राजीनामा पत्रात म्हटले आहे. दरम्यान कमल सप्रे व त्यांचे दत्त सप्रे यांनी १३ ऑक्टोबर रोजी सेनेचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांच्याकडे पक्षाचा राजीनामा दिला होता.