सुरक्षिततेची व्याख्या जितकी वाढवत नेतो आपण, तितकचं वातावरण हे असुरक्षित करत जातो. आजही नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत असताना नेहमीप्रमाणेच दोन बलात्काराच्या बातम्या, विवाहितांच्या आत्महत्येच्या, लैंगिक छळाबाबतच्या बातम्या नजरेस पडल्या. निर्भयाप्रकरण, कोपर्डीप्रकरणासारख्या घटना घडल्यानंतर जो समाजात आवेश निर्माण होतो. त्यावेळी वाटतं, की बास-आता पुन्हा असे होणे नाही. पण, तरीही हे प्रकार चालूच राहतात आणि आपण अनुत्तरितच राहतो. कठुआ, सुरत यांसारख्या प्रकरणांनी पुन्हा एकदा झोपी गेलेला समाज खडबडून जागा होतो.सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो... चौकाचौकांत खेद दर्शवणारे पत्रके झळकतात... पुन्हा पाऊस पडून गेल्यावर स्वच्छ ऊन पडावं, तसचं सगळे जण ‘काही झालचं नाही,’ या आविर्भावात वावरू लागतात. माणूस खरचं यंत्रवत बनत चाललाय आणि त्याच्या भावना बोथट होत चालल्यात या शब्दांचा प्रत्यय मला एखादी संवेदनशील घटना घडून गेल्यानंतरच्या काही दिवसांमध्ये येते. केवळ काही दिवसच जोशात राहिलो, तर आपल्याला जे खोटं समाधान मिळतं, की यात माझाही वाटा आहे. यातच जीवन सार्थक झाल्यासारखं वाटतं का आपल्याला? नक्की कुणाला फसवतो आपण? समाजाला की स्वत:लाच? या अशा घटना घडण्याला कारणीभूत कोण? अनेक जण या बाबतीत न्यायव्यवस्थेला दोष देऊन मोकळे होतात. घटना घडून गेल्यानंतर भूमिका सुरू होते न्यायव्यवस्थेची. पण एक नागरिक म्हणून या घटना घडूच नये, यासाठी कितपत प्रयत्न आपण करतो, हा प्रश्न प्रत्येकाने एकदातरी स्वत:ला विचारायलाच हवा. जर आपल्या नजरेसमोर, आपल्या परिसरात जर अशा घटना घडत असतील व आरोपी राजरोसपणे फिरत असतील तर आपण खरचं निर्दोष असू? आसपास माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असून, आपल्यावर काहीच फरक पडत नसेल तर खरचं आपलं कुठेच चुकत नसेल का?पूर्वीच्या काळी जर मुलगी वयात आली तर तिच्या सुरक्षिततेची काळजी बापाला वाटायची, ज्यातून पुढे बालविवाह सुरू झाले. आज परिस्थिती इतकी वाईट आहे, की ५ वर्षांची ती छोटीशी अजाण पोरही शोषली जातीय आणि ७० वर्षांच्या आजीबाई सुद्धा...! एक ‘माणूस’ म्हणून, त्यातही एक स्त्री म्हणून जेव्हा अशा घटना कानावर पडतात, तेव्हा फक्त सुन्न होऊन जाते. नसांमध्ये वाहणा-या रक्ताला उकळी फुटून ते बाहेर पडेल, की काय अशी भीती वाटते. कुठे एकतर्फी प्रेमापोटी, कुठे पैशांसाठी, कुठे वासनेपोटी, कुठे बदला घेण्यासाठी, तर कुठे ‘पुरुषत्व’ सिद्ध करण्यासाठी पदोपदी तिचाच बळी घेतला जातोय आणि कमाल म्हणजे, हे सगळं पाहूनही यावर ठोस पाऊल उचलावं, असं कुणालाच वाटत नाही का? हे सगळं थांबवण्यासाठीचा इलाज उपलब्धच नाही का, की शोधण्याचीच इच्छा नाही? आपल्यातील काहींना वाटतं, की थांबावं हे, पण त्यासाठी मी किंवा माझ्या घरातील कुणीही या फंद्यात पडू नये, असचं वाटतं सगळ्यांना. मान्य आहे मला, की सगळाच खराब रस्ता एकदम बदलवणं शक्य नसेलही, पण रस्त्यात येणारा खड्डा किंवा अडथळे बुजवता नसेलही... पण रस्त्यात येणारा खड्डा किंवा अडथळे बुजवता येणं नक्कीच शक्य आहे.जर आपल्या मुलींना समाजात वावरताना असुरक्षित वाटतयं तर त्या गोष्टीला जबाबदार आपणच आहोत. कारण, आपण मुलींना सुरक्षित ठेवण्याचे उपाय शोधतोय. आपल्याला खरी गरज आहे ती वातावरणच पूर्ण सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांची. पण, आपण मात्र डोकेदुखीसाठी मलम डोक्याला लावण्याऐवजी खाटेलाच लावत बसतोय. ज्यांना फक्त मुलचं आहेत- मुली नाही ते पालक आजच्या घडीला स्वत:ला भाग्यवान समजतात, की, आपल्यावर जबाबदारी नाही. पण आपण इथेच खरे चुकतो...!मुलींवर अत्याचार करणारे हात न् नजर ही पुरुषांचीच असते ना? मग उलट आजच्या काळात ज्या पालकांना मुलगे आहेत, त्यांची जबाबदारी ही १० पट वाढते. प्रत्येक आई-वडिलांचं कर्तव्य आहे, की त्यांनी आपल्या पोराला वाढवताना असं वाढवाव,ं की तो मुलगा प्रत्येक मुलीकडे-स्त्रीकडे आदरयुक्त भावनेनेच व वासनारहित नजरेनेच पाहू शकला पाहिजे. मुलींच्या स्वातंत्र्याला मर्यादा घालण्यापेक्षा पुरुषांच्या नजरेतील रावणच कसा नाहिसा होईल, या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे आणि या सगळ्या भयानक गोष्टींना अंत आहे, फक्त आपण एक पाऊल तरी उचलायला हवं. विझलेली मशाल पुन्हा पेटवायला हवी, इतरांसाठी नव्हे, तर स्वत:साठी येणाºया पिढीसाठी जोपर्यंत परिवर्तनाच्या क्षितिजापर्यंत पोहोचत नाही, तोवर आलेल्या तुफानातही पापणी लवता कामा नये. या अपंग मनाच्या दुनियेत आपण धडधाकट मनाने वावरायला हवं, हेच पुरुषांनी ठरवायला हवं. माणूसच माणुसकीची इतकी निर्दयतेने हत्या करतोय, की निर्दयतेलाही लाज वाटावी..! हे थांबायला हवं...! एकदा मुलांनी-पुरुषांनी स्वपरीक्षण करायला हवं जे ९० जण चांगली आहेत, त्यांनी १० जणांना बदलवण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण, आपला सहकारी किंवा मित्र कुठला दृष्टिकोन बाळगतो, हे न कळायला आपण मुर्ख नाहीत.या सगळ्या गोष्टीनंतरही मुलींनी-स्त्रियांनीही काही बदल हे करायलाच हवेत. का अपेक्षा ठेवता तुम्ही इतरांकडून, की त्यांनी तुमच्यासाठी लढावं? व्हा ना खंबर, स्वत:च सूर्य व्हा, जेणेकरून इतर किरणांची गरजच पडणार नाही. हिमतीने सामोरं जा, प्रत्येक गोष्टीला आणि माणसात हिंमत तेव्हाच येते, जेव्हा तुम्ही योग्य असाल. संत जनाबार्इंनी सांगितलयं,‘स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास!साधुसंता ऐसे केले जनीऋषींची कुळे उच्चारिली जेणेस्वर्गावरी तेणे वस्ती केली.’समाजात वावरताना भान असू द्या, आदब राखा तुम्ही स्त्री असल्याची....! ‘हमसे है जमाना, हम जमाने से नहीं,’ हे न विसरता आत्मविश्वासाने वावरा. पुरुषांच्या मनात आपल्याविषयी आदर आधी निर्माण होईल, असं कर्तृत्व करून दाखवा. मानसिकरीत्या- शारीरिकदृष्ट्या-आर्थिकदृष्ट्या स्वत:ला सक्षम बनवा. जेणेकरून तुमच्याकडे कुणी ‘अबला’ म्हणून पाहूच शकणार नाही. वाल्याचा वाल्मीकी करण्याची धमक आहे हं आपल्यात...! आणि तरीही, कुठे रावण दिसतात, तर अनेक रामरूपी माणसं तुमच्या पाठीशी असतीलच... फक्त व्यक्त व्हा. त्रास होत असेल तर सांगा. कारण, हाच अबोला नंतर जीवघेणा होऊ शकतो. अत्याचारांच्या प्रमाणात ओळखीच्या व्यक्तींच प्रमाण जास्त आहे, तर वरून तपेला ओळखून घ्या. स्वत:ला सक्षम बनवा.अनेक मुली त्रास सहन करतात- बोलत नाहीत, पण हीच गोष्ट पुढे कल्पनेपेक्षाही मोठं भयाण स्वरूप निर्माण करत असते. त्यामुळे टाळा हे...! कारण, स्वातंत्र्य न गमावण्याच्या शंकेमुळे-भीतीमुळे तुम्हाला आयुष्य गमवायला लागू नये, एवढीच कळकळीची विनंती आहे माझी. समस्त स्त्रियांना अनेक पर्याय आहेत त्रासापासूनच्या मुक्तीचे आणि अनेक खंबीर हातही पाठिंबा देणारे... फक्त जरासं धाडस करा.अशाच काही लहान-सहान गोष्टी समाजातील चांगल्या आणि ‘माणूस’ म्हणून जगणाºया स्त्री-पुरुषांनी पाळल्या ना तरी, हे बलात्काराचं, लैंगिक शोषण व अत्याचाराचं अतिप्रमाण हे अत्यल्प होईल, याची खात्री आहे मला.लिखाणं आवरतं घेत असताना स्त्रियांसाठी काही ओळी‘यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी निकलेगा,जमी बंजर हुई तो क्या, वही से पानीभी निकलेगा,ना हो मायूस, ना घबरा,अंधेरो से मेरे साथी,इन्ही रातों के दामन सेसुनहरा कल भी निकलेगा!’- आदिती रामेश्वर दुसुंगे, न्यू लॉ कॉलेज अहमदनगर