राहुरी : राहुरी येथील डॉ़ बाबुराव तनपुरे साखर कारखाना कोण चालविण्यास घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली असतानाच गुरुवारी दुपारी विखे कारखान्याच्या टिमने तनपुरे कारखान्याची पाहणी केली़ त्यामुळे राहुरीकरांमधील उत्सुकता अधिक वाढली आहे़ तनपुरे कारखाना चालविण्यासाठी राज्यभरातून अनेकांनी प्रशासकांकडे चौकशी केली असून प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम मुदत १७ आॅगष्ट आहे़दरम्यान गुरुवारी विखे कारखान्याचे अभियंते व अधिकाऱ्यांनी तनपुरे कारखान्याची पाहणी केली़ अनेक सहकारी संस्था व खाजगी उद्योगांचे लक्ष या कारखान्याकडे लागले आहे़अखेरच्या दिवशी प्रस्ताव दाखल होतील़ हा कारखाना चालविण्यास विखे सर्वाधिक उत्सुक आहेत़ विखे यांनी कारखाना चालविण्यासाठी घेतल्यास राहुरी तालुक्यावर त्यांची पक्कड अधिक भक्कम होणार आहे़मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही हा कारखाना चालविण्यासाठी घेण्याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याचे सांगितले जाते़ राहुरी व देवळाली नगरपरिषदा असून पक्षाला चांगले वातावरण तयार होईल, असे मनसे कार्यकर्त्यांनी ठाकरे यांना सांगितले़ त्यामुळे त्यांनीही निविदा भरण्याची तयारी सुरू केली आहे़ मनसेचे शहराध्यक्ष दिपक वराळे यांनी शालीनी ठाकरे यांना व्हॉटस्अॅपवर कारखान्याचे फोटो पाठविले आहे़ हिंदुस्थान अॅग्रोचे अध्यक्ष डॉ़ भारत ढोकणे यांनीही प्रस्ताव सादर केल्याची माहिती सांगण्यात येते़ याशिवाय मुंबईचे उद्योगपतीही स्पर्धेत आहेत़ आरती उद्योग समूह, नैना केमिकल्स (पनवेल) हे देखील कारखाना चालविण्यास उत्सुक आहेत़
तनपुरे कारखान्याची विखे टिमकडून पाहणी
By admin | Published: August 13, 2015 11:02 PM