अहमदनगर : महिलेवर वेळोवेळी अत्याचार करून तिला मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी असलेला कोतवाली पोलीस ठाण्याचा निरीक्षक विकास वाघ याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
याबाबत एका महिलेने २९ सप्टेंबर रोजी वाघ याच्या विरोधात अत्याचाराची फिर्याद दिली होती. वाघ याने संबंधित महिलेवर रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जबरदस्तीने वेळोवेळी अत्याचार केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यातून पिडिता गर्भवती राहिली. वाघ याने तिला गर्भपात करायला लावला. याची तक्रार करायला संबंधित महिला अधीक्षक कार्यालयात गेली. हा प्रकार वाघ याला समजल्यानंतर त्याने संबंधित महिलेला बियरची बाटली फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अखेर या सर्व घटनेची फिर्याद संबंधित महिलेने २९ सप्टेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. तेव्हापासून निरीक्षक वाघ फरार होता. मध्यंतरी त्याच्या निलंबनाचीही कारवाई पोलीस अधीक्षकांनी केली.
दरम्यान, या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी वाघ याने जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. यात सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले. गुन्ह्यात आरोपीविरूद्ध भक्कम कागदोपत्री पुरावे आहेत.
आरोपीने गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्वर, पट्टा, बिअरची बाटली, गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करणे बाकी आहे. आरोपीच्या अंगावरील कपडे, त्याचा मोबाईल, आरोपीने पिडितेच्या सह्या घेतलेले कागद व स्पॅम्प पेपर जप्त करणे बाकी आहे, तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजूर करावा, असा युक्तिवाद पवार यांनी केला. पवार यांना मूळ फिर्यादीतर्फे अॅड. महेश तवले यांनी मदत केली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन रद्द केला.