Coronavirus : प्रेरणेतून कोरोनाविरोधात उभे राहण्याची ताकद मिळतेय : डॉ. राजेंद्र विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 06:04 PM2020-05-09T18:04:10+5:302020-05-09T19:31:13+5:30
प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ आणि या विद्यापीठाचे उपकुलपती तसेच प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे. त्यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद...
गणेश आहेर
लोणी : कोरोनाविरोधात शासन लढाई लढत आहेत. काही संस्था आणि व्यक्तीही कोरोना योद्धे बनून सरकारला मदत करीत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात एक नाव प्राधान्याने गेली काही दिवस चर्चेत आहे, ते म्हणजे प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ आणि या विद्यापीठाचे उपकुलपती तसेच प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे. त्यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद...
प्रश्न : कोरोनाविरोधातील लढाईत ‘प्रवरा’ने आघाडी उघडली आहे, ही प्रेरणा कशी मिळाली?
विखे : संकट जेव्हा अधिक गडद होतात, तेव्हा झाडांनी मुळांच्या साहाय्याने मातीशी अधिक घट्ट जोडून घ्यायचे असते, हा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांनी घालून दिलेला नियम. आपण कायम संकटाच्या वेळी आपल्या माणसांबरोबर उभे असले पाहिजे, हा पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांचा विचार. या विभुतींच्या प्रेरणेतून कोरोनाविरोधात उभे ठाकलो आहोत. ग्रामीण भागातील लोकांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही कोविड-१९ सेंटर उभे केले.
प्रश्न- कोविड-१९ रुग्णालयात आपण काय सुविधा उभारल्या आहेत?
विखे : कोरोनाचे वादळ आपल्यापर्यंत येताच तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा झाल्यानंतर आयसोलेशन वॉर्ड करायचा ठरला. गावाबाहेर फक्त ६ दिवसात १०० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारले. यात २० बेड आयसीयु आहेत तर ४० बेडला आॅक्सिजन सुविधा आहे. इतर ४० बेड कोरोनाच्या कमी त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी आहेत. येथे ५०० तज्ज्ञ डॉक्टरांसह पॅरामेडिकल स्टाफचे ट्रेनिंग आणि त्यांच्या राहण्याच्या सुविधा निर्माण केल्या आहेत.
प्रश्न : कोरोनाच्या टेस्टसाठी आपण सुरु केलेल्या सुविधा काय आहेत ?
विखे : एक्स रे आणि रक्त चाचणीच्या साहाय्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करुन काही सेकंदात रुग्णांची वर्गवारी कोरोनाबाधित, कोरोना संशयित व इतर रुग्ण शोधण्याची प्रणाली आणली आहे. त्यासाठी प्रवरा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस आणि ग्रेट ब्रिटन स्थित एआय फॉर वर्ल्ड या संस्थेशी करार केला आहे़ तसेच मॉयक्रोबायलॉजी विभागाने अत्यंत कमी कालावधीत ट्यू्रनॅट मशिन व आरटीपीसीआर तंत्रज्ञान स्वीकारत नॅशनल अॅक्रेडेशन बोर्ड फॉर लॅबोरेटरी यांचे सर्टीफिकेशन मिळवले. शासनाची परवानगी मिळाली आहे. आता अवघ्या दोन तासात कोरोनाचा अहवाल प्रवरा अभिमत विद्यापीठ देणार आहे.
प्रश्न : लॅबची क्षमता काय आहे? कोरोनाग्रस्त रुग्णावर येथे उपचार होणार का?
विखे : लॅबच्या माध्यमातून कोरोनाच्या दर दोन तासाला चार टेस्ट होतील. मात्र यात पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाला कोठे उपचार द्यायचे याचा निर्णय जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा प्रशासन घेणार आहे. आम्ही कोविड-१९ रुग्णालय तयार ठेवले आहे. त्याचा वापर कसा करायचा याचा निर्णय शासन घेईल. सरकारी रुग्णालयाकडून आलेल्या रुग्णांना ही टेस्ट मोफत असेल. खाजगी डॉक्टरांकडून आलेल्या रुग्णांसाठी शासनाच्या नियमाप्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे.
प्रश्न : कोरोना लॅब सुरू झाल्याने इतर रूग्णांवर त्याचा परिणाम होणार का?
विखे : प्रवरा ग्रामीण रुग्णालय हे शासनाने कोरोनाशिवाय इतर आजारांसाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे मुख्य रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण असणार नाहीत. त्यामुळे ते जास्त सुरक्षित झाले आहे. याकाळात इतरत्र आरोग्य सुविधा मिळत नाहीत. यामुळे प्रवरा गरीब गरजू रुग्णांसाठी काम करेल. कोरोना टेस्ट लॅब अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही.