शेवगाव : तालुक्यातील राणेगाव येथील बेंद वस्तीवर ६३ के.व्ही.चे रोहित्र असून तेथून शंभरहून अधिक शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा होत आहे. परिणामी रोहित्रावर अधिकचा भार पडून वारंवार रोहित्र नादुरुस्त होत असल्याने टोणपेवस्ती या ठिकाणी नव्याने १०० के.व्ही.चे रोहित्र बसविण्यात यावे, अशी मागणी ॲड. शिवाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली राणेगाव ग्रामस्थांनी वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. एम. लोहारे यांच्याकडे केली आहे.
यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, म्हातारदेव आव्हाड, नवनाथ खेडकर आदी उपस्थित होते. राणेगाव येथील बेंद वस्तीवर ६३ के.व्ही.च्या रोहित्रावर सतत अधिकचा भार येत असल्याने कोणाच्याही विद्युत मोटारी चालत नाहीत. त्यामुळे शेतातील पिके वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाण्याअभावी जळू लागली आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाऊन मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या रोहित्रावर जास्त भार असल्याने काही ठिकाणी विद्युतवाहक तारा तुटणे, रोहित्र जळणे अशा घटना वारंवार होत आहेत. बेंदवस्ती येथील रोहित्रावरील वीज ग्राहक कमी करून जवळच गट नंबर ५१२ या ठिकाणी टोनपे वस्तीवर नव्याने रोहित्र बसवावे.
निवेदनावर एकनाथ गाढवे, महादेव खेडकर, नवनाथ खेडकर, नारायण गाढवे, राजेंद्र बिबे, नवनाथ बिबे, कानिफनाथ खेडकर, भागवत मुलमुले, बाळासाहेब भालेराव, गोरख वाघ यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
फोटो ओळी ०१ शेवगाव काकडे
शेवगाव येथे ॲड. शिवाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली उपकार्यकारी अभियंता एस. एम. लोहारे यांना निवेदन देताना राणेगावचे ग्रामस्थ.