लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या ४० टक्के शुल्कामुळे राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये दरात मोठी घसरण उडाली आहे; मात्र केंद्राच्या या निर्णयामुळे पाकिस्तान आणि चीनमधील कांद्याची मागणी वाढली आहे. त्याचा दूरगामी परिणाम देशांतर्गत कांदा उत्पादकांना सोसावा लागणार आहे.
सरकारने शून्य टक्के निर्यात शुल्कावरून थेट ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याचा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थेट फटका बसला आहे. क्विंटलमागे २८०० ते ३००० रुपयांवर गेलेले दर अवघ्या एक-दोन बाजारांमध्ये ५०० रुपयांनी पडले आहेत. यात आणखी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुढील काळात लवकरच दक्षिणेकडील राज्यांतील कांद्याचे उत्पादन होऊन तो माल बाजारात दाखल होईल. त्यामुळे बाजारभावात कोणतीही सुधारणा होणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, कांदा निर्यातीवरील ४० टक्के वाढीमुळे मलेशिया, नेपाळ, बांगलादेश तसेच अरब राष्ट्रांमध्ये निर्यातीला फटका बसला आहे. भारताऐवजी आता पाकिस्तान आणि चीन येथील कांद्याला मागणी वाढणार आहे. त्याचे दूरगामी परिणाम देशातील कांदा निर्यातीवर होणार आहेत. पाकिस्तान आणि चीनचे संबंध निर्यातक देशांमध्ये प्रस्थापित झाल्यास ते भारताला परवडणारे नाही, असे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वढावणे यांचे म्हणणे आहे.तत्काळ परिणामकेंद्राच्या निर्णयाचा तत्काळ परिणाम व्यापाऱ्यांवर झाला आहे. बांगलादेश सीमेवर कांद्याची मोठी वाहने खोळंबली आहेत. निर्यात शुल्कावरील ४० टक्के दरवाढीने व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाहनांमध्ये लोड केलेल्या या मालाचे संकट उभे राहिले आहे.