मिरजगाव : टेम्पो चालकाने अपघातातील जखमीला तातडीने रुग्णालयात नेतो, असा बहाणा करुन जखमीच्या खिशातील रोकड लुटून त्यास रस्त्यावर फेकल्याची घटना मिरजगावनजीक घडली़ त्या जखमीचे उपचारादरम्यान सोमवारी रात्री पुण्यात निधन झाले.नगर-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास मांदळीनजीक घोगरगाव येथील काम आटोपून मोटारसायकलवरून घराकडे परतत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप टेम्पोने मोटारसायकलला जोराची धडक दिली. यामध्ये अरूण बन्सी हुलजुते हे गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी मिरजगावकडे पाठवण्यासाठी अपघातस्थळी जमलेल्या लोकांनी १०८ या रूग्णवाहिकेशी संपर्क साधला, परंतु संपर्क न झाल्याने अपघात घडलेल्या टेम्पो चालकाने उपचारासाठी मी मिरजगाव येथे दाखल करतो, असा बहाणा करून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या हुलजुते यांना घेऊन मिरजगावमध्ये न थांबता मिरजगावपासून दीड किलोमीटरवर मिरजगाव-कर्जत रस्त्यावर गवतात फेकून दिले. त्यांच्या खिशातील पंचवीस हजार रोकड घेऊन चालक फरार झाला. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत नातेवाईकांनी त्यांचा दवाखाने, रस्त्यावर शोध घेतला़ परंतु ते मिळून आले नाही. शनिवारी सकाळी अत्यवस्थेत ते मिळून आल्यावर तातडीने आधी नगरला व नंतर पुण्याला हलविले होते.
अपघातातील जखमीला दवाखान्यात नेण्याऐवजी फेकले मिरजगाव-कर्जत रस्त्यावर; जखमीचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:37 AM