अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्यामुळे प्रादेशिक साखर सहसंचालकांनी कारखान्याची चौकशी केली आहे. या चौकशीअंती कारखान्याला निर्देश देण्यात आले असून तीन महिन्यात त्रुटी सुधारण्यास सांगण्यात आले आहे.घनश्याम शेलार व इतर सभासदांनी याबाबत गतवर्षी डिसेंबरमध्ये तक्रार केली होती. कारखान्याचा तोटा दिवसेंदिवस वाढत असून कारखान्याच्या २०१६-१७ चा अहवाल पाहिल्यानंतर काही आकडेवारीबद्दल आमच्या मनात शंका निर्माण झाल्या होत्या. याबाबत सर्वसाधारण सभेत विचारणा केली असता अध्यक्षांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप आमदार आहेत. पण कारखान्यात आम्हाला कुठलीही माहिती मिळत नाही अशी तक्रार करत एकूण दहा मुद्यांबाबत सरकारकडे तक्रार करण्यात आली आहे. कारखान्याने २०१६-१७ या वर्षात घसारा निधीची तरतूद केलेली नाही. या अहवाल वर्षात ऊस अॅडव्हान्स पोटी ९ कोटी २४ लाख रक्कम दिल्याचे दर्शविले आहे. राजकीय कार्यकर्त्यांना या पैशाचे वाटप झाले असून ही रक्कम वसूल होत नसल्याने थकबाकी वाढली आहे. ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार अॅडव्हान्सही ११ कोटी दर्शविला असून या रकमाही अनेक वर्षांपासून थकीत आहेत. या दोन्ही रकमांचा परिणाम कारखान्याच्या नफ्यावर होत आहे. अहवालात ९ कोटी २९ लाख रुपयांचे व्याज कारखान्यास येणे दाखविले आहे. मात्र, हे येणे कुठल्या बँकेकडून आहे याचा तपशील अहवालात नाही असे तक्रारीत म्हटले होते.या तक्रारीवरील चौकशीनंतर घसारा खर्च नफातोटा खाती खर्च दाखवावा, अॅडव्हान्सच्या रकमा वसुलीसाठी ठोस नियोजन करावे, ऊस तोडणी अॅडव्हान्सच्या वसुलीसाठी दावे दाखल करावेत, तसेच व्याजाबाबत कारखान्याने खर्च नोंदवून खरी वस्तुस्थिती सभासदांच्या निदर्शनास आणणे आवश्यक होते, असे निर्देश सहसंचालक संगीता डोंगरे यांनी दिले आहेत. कारखान्याने ३१ मार्च २०१७ पर्यंत ८९ कोटी रुपयांचे देणे दाखविले आहे. याबाबत कालबद्ध परतफेडीचा कार्यक्रम आखून अंमलबजावणी करावी. तसेच परतफेडीचा अहवाल सादर करावा, असेही म्हटले आहे. तसेच ऊस प्रोत्साहन खर्चाबाबत साखर आयुक्त कार्यालयाची मान्यता घेणेबाबत कार्यवाही करण्यास सांगितले आहे. कर्मचारी भरतीबाबतही तक्रार असल्याने याबाबत स्टाफिंग पॅटर्ननुसारच कार्यवाही करावी, असे डोंगरे यांनी निर्देशात म्हटले आहे.
कुकडी कारखान्याचा तोटा वाढला असून आमदार राहुल जगताप हे त्यांचे कार्यकर्ते पोसण्यासाठी अनियमितता करुन कारखान्याचे नुकसान करत आहेत. कोट्यवधीच्या रकमांचा हिशेबच नाही. हिशेबात अनियमितता असून, कारखाना कार्यस्थळावर माहिती मिळू दिली जात नाही. साखर सहसंचालकांनी कारवाई न करता केवळ निर्देश दिले आहेत. ही पळवाट आहे. त्यामुळे याबाबत सहकार मंत्र्यांकडे अपील दाखल केले आहे.- घनश्याम शेलार, शिवसेना नेते.कारखान्याबाबतच्या तक्रारीतील काही मुद्यांवर कारखाना व्यवस्थापनाला निर्देश देण्यात आले आहेत. त्यात सुधारणा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ती मुदत १४ नोव्हेंबरला संपली आहे. मात्र, कारखान्याकडून अहवाल आलेला नाही. अहवाल मागविला जाईल.- संगीता डोंगरे, प्रादेशिक सहसंचालक (साखर)
कारखान्याची चौकशी झाली आहे. आपण सध्या बाहेरगावी असून नगरला आल्यानंतर या प्रत्येक मुद्याबाबत सविस्तर माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात राहुल जगताप यांनी ‘लोकमत’ला दिली.