अहमदनगर : जिल्ह्यातील खासगी आणि सरकारी कोविड केअर सेंटरमध्ये १० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत. स्थानिक प्रशासनाने त्यांचा कोणताही विमा उतरविला नाही. मात्र, पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमाकवच दिले आहे. त्यामध्येच या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार आहे. सध्या या योजनेलाही मुदतवाढ मिळाली असल्याने अन्य कोणताही विमा काढण्याची गरज उरली नसल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.
गतवर्षीपासून कोरोना साथीचा विळखा कायम आहे. कोरोना साथीच्या संकटात जीवाची पर्वा न करता हजारो कर्मचारी कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. गतवर्षी पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत कोरोना साथीत लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ५० लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. मात्र, त्याची मुदत मार्च-२०२० पर्यंतच होती. त्यानंतर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे कोरोना लढ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काही बरे-वाईट झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न होता. याबाबत काही खासदारांनी केंद्राकडे विमा सुरक्षा योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. ती मागणी केंद्र सरकारने मंजूर केली. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याच कारणामुळे कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अन्य कोणतीही पॉलिसी काढण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----------------
अशी आहे ही योजना...
सरकारी रुग्णालये आणि आरोग्य सेवा केंद्रांमध्ये कोविड-१९ चा सामना करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना
सफाई कर्मचारी, वॉर्ड बॉइज, परिचारिका, आशा कार्यकर्त्या, निमवैद्यकीय, तंत्रज्ञ, डॉक्टर आणि तज्ज्ञ आणि इतर सरकारी, कंत्राटी आरोग्य कर्मचारी, कोविड केंद्रावर काम करणारे सफाई कर्मचारी या विशेष विमा योजनेत समाविष्ट असणार आहेत.
कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या कोणत्याही आरोग्य व्यावसायिकांना काही दुर्घटना झाल्यास या योजनेंतर्गत त्यांना ५० लाख रुपयांची भरपाई दिली जाईल.
सर्व सरकारी आरोग्य केंद्रे, कल्याण केंद्रे आणि कोविड केअर सेंटर, राज्यातील रुग्णालये या योजनेंतर्गत समाविष्ट असतील. जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेत ३५०० कर्मचारी सरकारी आणि तेवढेच कंत्राटी कर्मचारी आहेत, तर महापालिका क्षेत्रात कोविड सेंटरवर शंभरपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. जिल्हा रुग्णालयातही सरकारी आणि कंत्राटी मिळून ४०० ते ५०० कर्मचारी कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत.
---
काय म्हणतात अधिकारी, संघटना---
पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत कर्मचाऱ्यांना विमा सुरक्षा देण्यात आली आहे. मग तो कर्मचारी शासकीय असो की कंत्राटी. ठेकेदाराचा कर्मचारी कोविड सेंटरमध्ये काम करीत असला, तरी त्याला हे कवच मिळणार आहे.
-अनंत लोखंडे, कामगार संघटना नेते
------
अहमदनगर शहरात सध्या कोविड केअर सेंटर आहेत. या सर्व कोविड सेंटरवर सर्व मिळून शंभराच्यावर कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना पंतप्रधान गरीब पॅकेजअंतर्गत विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यांचा स्थानिक ठिकाणी कोणताही विमा काढलेला नाही. सुरक्षेसाठी त्यांचे आधीच लसीकरण करण्यात आले आहे. काम करताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर कुटुंबीयांना ५० लाख देण्याची तरतूद विमा योजनेत आहे.
-डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका
-----------------
जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेत सात ते आठ हजार कर्मचारी कोरोनाविरुद्धच्या लढाईत चोख काम करीत आहेत. त्यांना पंतप्रधान आरोग्यरक्षक विमा योजना लागू आहे. कोणत्याही काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला ५० लाख रुपये देण्याची तरतूद आहे. त्यासाठी वेगळी प्रक्रिया राबविण्याची कोणतीही गरज नाही. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सर्वांना सुरक्षाकवच आहे.
-डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद
----------------
हजारांच्यावर पॉझिटिव्ह
जिल्हा आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी साधारणपणे एक हजारांच्यावर कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. त्यामध्ये जिल्हा रुग्णालय, महापालिका, महसूल आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. बाधितांपैकी काही जणांचे बळी गेले असून त्यांना ५० लाखांच्या विम्याचे धनादेशही वितरित करण्यात आलेले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा डिसेंबर ते एप्रिल या काळात सर्वाधिक जास्त सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.
--
डमी- नेट फोटो
०३ कोविड सेंटर-१
०३ डॉक्टर्स
३० इन्शुरन्स ऑफ कोविड स्टाफ डमी