चंद्रकांत शेळके, अहमदनगर : यापुढे भरती होणाऱ्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार नाही. आंतरजिल्हा बदली करू इच्छिणाऱ्या शिक्षकांना थेट राजीनामाच द्यावा लागेल व जेथे बदली हवी तेेथे पुन्हा परीक्षा देऊन गुणवत्तेच्या आधारे नियुक्ती मिळवावी, असा निर्णय मागील आठवड्यात शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा शिक्षक संघटनांमधून जोरदार विरोध होत असून शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे.
शालेय शिक्षण विभागाने २१ जून रोजी शासन आदेश काढून त्यात नव्याने काही शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन केले आहे. तसेच शिक्षकांच्या बदलीबाबत सुधारित धोरण घेतले आहे. त्यानुसार नवीन भरती झालेल्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार नाही. यामुळे एका जिल्ह्यात नियुक्ती झालेले शिक्षक पुढे दुसऱ्या जिल्ह्यात बदली करू शकणार नाही. बदली करण्यासाठी नोकरी सोडावी लागेल व पाहिजे त्या जिल्ह्यात नियुक्तीसाठी पुन्हा अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा द्यावी लागेल. केवळ अपवादात्मक स्थितीतच बदली होणार आहे. यामुळे शिक्षकांसह संघटनाही संतापल्या आहेत.
बदली हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा अधिकार असतो. बदली बंद करून शासन शिक्षकांवर अन्याय करू शकत नाहीत. शिक्षकांच्या बदल्या करताना होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी २०१७ मध्ये राज्याचे तत्कालिन ग्रामविकास मंत्री आणि ग्रामविकास सचिव यांनी शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन केली होती. या निर्णयामुळे शिक्षकांच्या बदल्या सुरळीत झाल्या, शिवाय भ्रष्टाचार थांबला. आता बदलीसाठी ज्या अटी टाकल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा भ्रष्टाचार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.जिल्हांतर्गत बदलीचे धोरण ठरवावे
शिक्षण विभागाने ग्रामविकास विभागालाही आपल्या धोरणात या अनुषंगाने बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हांतर्गत आपसी बदली, वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने वा पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत अपवादात्मक प्रकरणांतील बदलीबाबत ग्रामविकास विभागाने धोरण ठरवावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.त्या शिक्षकांना एक संधी
दरम्यान, जुन्या शिक्षकांपैकी इच्छुक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची एक संधी दिली जाईल. ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची २०२२ मधील कार्यवाही पूर्ण झाली आहे, मात्र विनंती बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांची प्रतीक्षा यादी तयार करून पदे रिक्त होतील, त्याप्रमाणे नियुक्ती दिली जाणार आहे.बदल्या नको ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा. आंतरजिल्हा बदल्या करताना जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे रोष्टर एक करावे. म्हणजे जुन्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला गती येईल. - बापूसाहेब तांबे, शिक्षक नेते, गुरुमाऊली मंडळपरजिल्ह्यात सेवा करणाऱ्या शिक्षकांची बदलीच न करणे हे धोरण अत्यंत चुकीचे आहे. कारण वर्षानुवर्षे काही शिक्षक स्वतःच्या कुटुंबापासून दूर सेवा देतात. त्यांना न्याय मिळायला हवा. वघड व पेसा क्षेत्रातील बदल्यांबाबत धोरण ठरविणे गरजेचे आहे. - प्रवीण ठुबे, शिक्षक नेते, प्राथमिक शिक्षक परिषद