अहमदनगर : शहरात स्वच्छतेची पाहणी सुरु होणार असल्याने आज महापौर सुरेखा कदम यांनी सावेडी येथील जॉगिंग ट्रॅकवर लोकांशी संवाद साधला. यावेळी लोकांना स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, स्वच्छता दूत शारदा होशिंग उपस्थित होते.
महापौर कदम म्हणाल्या 'स्वच्छ भारत हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य शासन अधिक गतीने पावले टाकत आहे. परंतु नगरमधून यासाठी अजून १३०० स्वच्छता अँप डाउनलोड होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यास लोकांनी प्रतिसाद द्यावा. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिका क्षेत्रात विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांचा अधिकाधिक सहभाग घ्यावा महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेसाठी विविध पातळ्यांवर काम सुरू असल्याचे सांगितले. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड करुन त्यांच्या परिसरातील कच-याच्या समस्या, घंटागाडीच्या समस्या महापालिकेपर्यंत पोहोचवाव्यात, तसेच नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत अधिकाधिक सहभाग घेऊन शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यात योगदान द्यावे, असेही त्या म्हणाल्या.