संगमनेर : आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीमध्ये शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी आंतरशाखीय संशोधनावर भर दिल्यास संशोधन हे समाजाभिमुख होऊन त्याचा उपयोग सर्व क्षेत्रांच्या जडणघडणीमध्ये होईल, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठातील रिसर्च फाऊंडेशन पार्कचे सीईओ डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी केले.
संगमनेर महाविद्यालय, विज्ञान मंडळ आयोजित ऑनलाईन विज्ञान दिनानिमित्त व विज्ञान मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी शाळीग्राम बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, प्रा. प्रवीण त्र्यबंके, सहसमन्वयक डॉ. अशोक तांबे आदी उपस्थित होते.
डॉ. शाळीग्राम म्हणाले, संशोधनाचे उद्दिष्ट निश्चित करून, वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून ते कसे पूर्ण करता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. एक परिपूर्ण संशोधन हे भारतातील समाजाला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर घेऊन जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड यांनी सर्वप्रथम उपस्थितांना विज्ञान दिनाच्या सुभेच्छा दिल्या. डॉ. सी. व्ही. रामन यांच्या कार्याचा आढावा घेतला.
प्रास्ताविक प्रा. प्रवीण त्र्यंबके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रियंका डुबे यांनी केले. डॉ. अशोक तांबे यांनी आभार मानले.