श्रीरामपूर : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अन्न, नागरी, पुरवठा विभागाने अपात्र शिधापत्रिका शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. शिधापत्रिकेतील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस जोडणी नाही असे हमीपत्र त्यात लिहून घेतले जात आहे. गोरगरिबांना अन्नधान्यापासून वंचित ठेवण्याचा हा केंद्राचा डाव असल्याचा आरोप आमदार लहू कानडे यांनी केला आहे.
शिधापत्रिकाधारकांकडून निवासाच्या मालकीचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, वाहन परवाना, आधार कार्ड यापैकी एक वर्षाच्या आतील पुरावे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय शिधापत्रिका तपासणी नमुना म्हणून एक अजब हमीपत्र भरून घेतले जात आहे. त्यात शिधापत्रिकेतील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस जोडणी नाही. भविष्यात गॅस जोडणी घेतल्यास त्याची माहिती तत्काळ शिधावाटप कार्यालयास देण्यास बंधनकारक राहील. तसे न झाल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल याची जाणीव आहे, असा मथळा लिहून घेतला जात आहे. या हमीपत्रावर कुटुंबप्रमुखाची सही असते, अशी माहिती आमदार कानडे यांनी दिली.
आतापर्यंत राज्यातील कार्यरत बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केसरी, शुभ्र व आस्थापना कार्ड अशा सर्व प्रकारच्या देण्यात येत आहेत. यामध्ये मुख्यतः दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी पिवळी शिधापत्रिका, रुपये एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी केशरी शिधापत्रिका आणि इतर सर्वांसाठी शुभ्र शिधापत्रिका देण्यात येते. शिधापत्रिका तपासणी मोहीम ही सार्वजनिक वितरण व्यवस्था ( नियंत्रण आदेश) २०१५ नुसार निरंतर प्रक्रिया आहे. मात्र केंद्र सरकारच्या निर्देशानुसार यावेळेस गॅस जोडणी बाबतचे लेखी हमीपत्र घेऊन गोरगरीब माणसांच्या शिधापत्रिका कोणत्याही क्षणी रद्द करून त्याला कायमचे अन्नधान्यापासून वंचित करण्याचा डाव आहे, अशी टीका कानडे यांनी केली आहे.
...
ठाकरे, भुजबळ यांना पत्र
केंद्राने २८ जानेवारी २०२१ रोजी जारी केलेले परिपत्रक तत्काळ मागे घ्यावे यासाठी आमदार लहू कानडे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी पत्र पाठविले आहे.
..
गरिबांच्या तोंडचा घास हिरावणार?
पंतप्रधान मोदी सरकारने गोरगरीब महिलांना उज्ज्वला गॅस दिल्याची व त्या अंतर्गत आठ कोटी कुटुंब लाभान्वित केल्याची मोठी जाहिरात केली आहे. आता मात्र एक सिलिंडर देऊन कायमस्वरूपी गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा त्यामागे कुटील हेतू तर नाही ना? अशी शंका कानडे यांनी उपस्थित केली आहे.