राहुरी : राज्यमंत्री तनपुरे हे अतिशय संयमी, सभ्य, सुसंस्कृत असून त्यांची व त्यांच्या कुटुंबाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यांचा पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणात काडीचाही संबंध नाही. परंतु, या हत्येचे राजकीय भांडवल करुन तनपुरे यांना बदनाम करण्याचा डाव भाजपच्या नेत्यांनी मांडला आहे. तनपुरे यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे व नैराश्येतून केले असल्याचे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी सांगितले.
ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्याने भाजप नेते सैरभैर झाले आहेत. त्याची अवस्था ना घाट का, ना घर का अशी झाली आहे. त्यातच राहुरीचे विधानसभा सदस्य प्राजक्त तनपुरे हे विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून गेले व मंत्रिमंडळात लगेच राज्यमंत्री पद मिळाल्याने स्थानिक भाजप नेत्यांना त्यांची पोटदुखी झाली. तनपुरेंचा राज्याच्या राजकारणातील वाढता उत्कर्ष या भाजपच्या नेत्यांना पाहावत नाही. त्यामुळेच त्यांनी असे बिनबुडाचे आरोप करुन तनपुरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सर्वसामान्य नागरिक आज कोरोनामुळे अडचणीत असून याच्याशी या भाजपला व त्यांच्या पुढाऱ्यांना कोणतेही देणे घेणे नाही. फक्त राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच भाजपचे कटकारस्थान सुरु आहे. परंतु भाजप व त्याच्या पुढाऱ्यांना जनता ओळखून आहे. त्याच्या भूलथापांना सामान्य जनता कधीच बळी पडणार नाही, असे मत मापारी यांनी व्यक्त केले.