अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाने शताब्दी भेटीच्या नावाखाली खरेदी केलेल्या घड्याळ खरेदी व्यवहाराच्या चौकशीसाठी उपनिबंधक कार्यालयासमोर रोहोकलेप्रणीत गुरुमाऊली मंडळाने घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
उपनिबंधकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, घड्याळ खरेदीची मूळ कागदपत्रे सभासदास देण्याचे आदेश उपनिबंधक कार्यालयाने शिक्षक बँकेला बजावले होते. मात्र, बँकेने उपनिबंधक कार्यालयाच्या लेखी आदेशाला केराची टोपली दाखवून न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे खोटे कारण देऊन उपनिबंधक कार्यालयाची दिशाभूल व अवमान केला आहे. घड्याळ खरेदी करताना बँकेच्या संचालक मंडळाने आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संगनमताने अतिशय चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला आहे, तसेच शिक्षक बँकेच्या एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०२० अखेरपर्यंतच्या आर्थिक गैरव्यवहार व अनियमिततेबाबत उपनिबंधक कार्यालयाच्या स्तरावरून कार्यवाही करण्यास विनंती करण्याबाबत अर्ज केला आहे. मात्र, उपनिबंधक कार्यालयाकडून त्यात नमूद केलेल्या मुद्यांबाबत शिक्षक बँकेशी पत्रव्यवहार, तसेच योग्य कार्यवाही केलेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर विकास डावखरे, संजय शेळके, प्रवीण ठुबे, राजू थोरात, गणेश वाघ, संजय शिंदे, कारभारी खामकर, संतोष निमसे, बाळासाहेब वाबळे, सुहास साबळे आदींची नावे आहेत.
..........................
शिक्षक बँकेवर तातडीने कारवाई करावी, तसेच एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०२० अखेरपर्यंतच्या आर्थिक गैरव्यवहार व अनियमिततेबाबत फेरहिशोब तपासणी करण्याचे आदेश पारित करावेत, या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करणार आहोत.
-विकास डावखरे, जिल्हाध्यक्ष, गुरुमाऊली मंडळ (रोहोकलेप्रणीत)
................
०४ शिक्षक निवेदन