करंजी : लोहसर व करंजी परिसरात झालेल्या एकाही चोरीचा तपास लावता न आल्यामुळे पोलिसांच्या विरोधात करंजी परिसरातील लोहसर, खांडगाव, भोसे, वैजुबाभुळगाव, देवराई, घाट सिरस, सातवडसह अनेक गावातील संतप्त नागरिकांनी नगर - पाथर्डी महामार्गावर सुमारे दोन तास रास्ता -रोको आंदोलन केले.बुधवारी लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिरातील ३ ते ४ लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मागील आठवड्यात करंजी गावात एकाच रात्री आठ घरफोडया झाल्या. येथील अनेक हॉटेल्स फोडण्यात आले. नगर - पाथर्डी महामार्गावरील करंजी घाट तर प्रेते टाकण्याचे ठिकाण झाले असून, यापैकी एकाही बेवारस प्रेताचा पोलिस खात्याला तपास लावता आला नाही. करंजी परिसरातील चो-याचे सत्र थांबविण्यात पोलिसांना अपयश आले. परिसरातील कायदा सुव्यवस्था ढासळली असून, गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना येत नसल्याच्या निषेधार्थ परिसरातील नागरिकांनी आज दोन तास महामार्ग रोखून धरला.लोहसरचे सरपंच अनिल गिते यांनी लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिरात झालेल्या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी करंजीचे सरपंच व खरेदी -विक्री संघाचे चेअरमन बाळासाहेब अकोलकर, जि.प. सदस्य अनिल कराळे, बाभुळगावचे सरपंच रावसाहेब गुंजाळ, रफिक शेख, इलियास शेखसर, बंडु पाठक, सुनिल साखरे, राजेंद्र दगडखैर, सुरेश चव्हाणसह परिसरातील व तालुक्यातील अनेक वक्त्यांनी या चोरीचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
मंदिरातील चोरीचा तपास शून्य : ग्रामस्थांचे नगर- पाथर्डी रस्त्यावर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 2:28 PM