अरुण वाघमोडे
अहमदनगर: बँकिंग क्षेत्रात मोठा लौकिक असलेल्या अहमदनगर शहर सहकारी आणि नगर अर्बन बँकेतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा चव्हाट्यावर येऊन गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांचा तपास मात्र कासवगतीने सुरू आहे. शहर बँकेच्या गुन्ह्यात तर अद्यापपर्यंत दोषारोेपपत्र दाखल झालेले नाही हे विशेष. या सर्व गुन्ह्यांचा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू आहे.
शहर सहकारी बँकेतून १७ कोटी २५ लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप केल्याप्रकरणी डॉक्टर नीलेश शेळके याच्यासह बँकेचे संचालक मंडळ व इतर २५ जणांविरोधात सप्टेंबर २०१८ मध्ये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल होऊन अडिच वर्षे होत आली तरी या याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार डॉ. नीलेश शेळके शेवटपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेला सापडलाच नाही. पंधरा दिवसांपूर्वी दुसऱ्याच आरोपीच्या शोधात असताना एलसीबी पथकाला शेळके मिळून आला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. बँक खात्यातून परस्पर २ कोटी ७३ लाख रुपये वर्ग करून घेतल्याबाबत खातेदार बाबुलाल सुमेरलाल बच्छाव यांच्या फिर्यादीवरून शहर सहकारी बँकेतील संचालक मंडळ व अधिकाऱ्यांविरोधात १५ ऑगस्ट रेाजी पुन्हा एक गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल होऊन पाच महिने झाले तरी या प्रकरणाच्या तपासात काहीच प्रगती नाही.
नगर अर्बन बँकेची २२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाख झाला आहे. याच बँकेची ३ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अर्थिक अपहाराच्या अशा अनेक प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. अपवाद वगळता गेल्या अडिच ते तीन वर्षांत एकाही मोठ्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झालेले नाही.
-----------------------------------------------------------------------------------
स्वतंत्र शाखेचा उपयोग काय
अर्थिक अपहाराबाबत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा कार्यरत आहे. मात्र तपास किचकट आणि क्लिष्ट असल्याचे कारणे देत अनेक गुन्ह्यांचा तपास या शाखेत रखडला आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी न्याय कुणाकडे मागयाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-------------------------------------------------
आर्थिक गुन्हे शाखेकडे असलेल्या सर्व गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास सुरू आहे. अशा स्वरुपाच्या गुन्ह्यात जोपर्यंत सक्षम पुरावे हाती येत नाहीत तोपर्यंत कुणालाही अटक करणे संयुक्तिक ठरत नाही. शहर सहकारी बँकेतील गुन्ह्याचे लवकरच दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.
- प्रांजल सोनवणे, पोलीस उपाधीक्षक तथा तपासी अधिकारी