नेवासा : नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराजांना अयोध्या येथे ५ आॅगस्ट रोजी होणा-या श्रीराम जन्मभूमी नियोजित मंदिराच्या भूमिपूजन व शिलान्यास कार्यक्रमाचे निमंत्रण आले आहे. सोमवारी (३ आॅगस्ट) ते अयोध्येला रवाना होणार आहेत. श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या वतीने हे विशेष निमंत्रण भास्करगिरी महाराजांना देण्यात आले आहे.
भास्करगिरी महाराजांनी श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्यावेळी महाराष्ट्र कारसेवा समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते. अनेक वर्षाच्या संघषार्नंतर श्रीराम जन्मभूमीच्या नियोजित मंदिराचा भूमिपूजन व न्यास पूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशातील प्रमुख संत महंतांच्या हस्ते हा सोहळा होत आहे. या कार्यक्रमासाठी भास्करगिरी महाराजांना निमंत्रण देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून श्रीराम जन्मभूमी न्यासाचे विश्वस्त मंडळाचे सदस्य असलेले महंत गोविंददेवगिरी महाराज व्यास यांच्यासह विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील भक्त परिवारासह श्रीराम भक्तांकडून ही आनंद व्यक्त केला जात आहे. भास्करगिरी महाराजांसमवेत विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री अॅड.सुनील चावरे हे देखील अयोध्येला जाणार आहेत.